…तर एसटीचे अधिकारीच जबाबदार राहतील; पाटणच्या कर्मचाऱ्यांचा इशारा

एसटी विलीनीकरणाची मागणी पूर्ण न केल्याने राज्यातील अनेक कर्मचाऱ्यांनी निराशेपोटी आत्महत्या केल्या असून, संपूर्ण राज्यभर कर्मचारी दुखवटा पाळत आहेत.

    पाटण : एसटी विलीनीकरणाची मागणी पूर्ण न केल्याने राज्यातील अनेक कर्मचाऱ्यांनी निराशेपोटी आत्महत्या केल्या असून, संपूर्ण राज्यभर कर्मचारी दुखवटा पाळत आहेत. अशा परिस्थितीत अधिकाऱ्यांकडून दबाव व निलंबनाच्या धमकीचे पत्र कर्मचाऱ्यांना दिले जात आहे. या चुकीच्या कारवाईमुळे संताप व्यक्त केला जात असून, कर्मचाऱ्यांमध्ये भिती व तणावाचे वातावरण आहे. यामुळे कर्मचारी व कुटुंबियांच्या जीवाचे काही बरे-वाईट झाल्यास त्यास सर्वस्वी जबाबदार एसटी प्रशासन अधिकारी राहतील, असा इशारा पाटण आगारातील कर्मचाऱ्यांनी लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.

    या निवेदनाच्या प्रती प्रांताधिकारी सुनील गाडे, तहसीलदार रमेश पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पाटण, पोलीस स्टेेशन पाटण यांना देण्यात आल्या आहेत.

    निवेदनात म्हटले की, संपूर्ण राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांनी एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याची मागणी केलेली आहे. मात्र ती मागणी पूर्ण न केल्याने राज्यातील ४० ते ४५ एसटी कर्मचाऱ्यांनी निराशेपोटी आत्महत्या केल्या आहेत. त्या आत्महत्यांचा दुखवटा कर्मचाऱ्यांनी पूर्ण राज्यभर पाळलेला आहे. अशा परिस्थितीत दबाव आणून जबरदस्तीने निलंबनाची धमकी देऊन आम्हाला कामावर बोलवले जात आहे. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यात भितीचे वातावरण आहे. राज्यभर दुखवटा होत असताना आम्ही कामावर गेलो तर एसटी प्रशासनाच्या बसेस अथवा प्रवाशांचे कोणतेही नुकसान झाल्यास व कर्मचाऱ्यांना, त्यांच्या कुटुंबियांना मारहाण झाल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार एसटी प्रशासन अधिकारी राहतील, असे आम्हाला लेखी स्वरूपात द्यावे. त्यानंतरच सर्व कर्मचारी विचार करून निर्णय घेतील. अन्यथा निलंबन अथवा कोणतीही कारवाई करायची असेल तर सामुदायिक करण्यात यावी.

    केवळ एक, दोन कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येवू नये. त्यामुळे जर त्यांच्या कुटुंबियांच्या जीवाचे काही बरे, वाईट झाल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार एसटी प्रशासन, अधिकारी असतील, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.