मंगळवेढा आगारातील आत्तापर्यंत ‘इतके’ कर्मचारी निलंबित

मंगळवेढा आगारातील एसटी कर्मचार्‍यांचा एसटी महामंडळाचे विलगीकरण शासकीय सेवेत करावे, या मागणीवर ठाम असल्याने गेले महिनाभर सुरु असलेला संप (ST Workers Strike) अद्यापही कायम असून, २१० चालक-वाहकांपैकी १५ कर्मचार्‍यांना आत्तापर्यंत निलंबित (ST Workers Suspended) करण्यात आले आहे.

    मंगळवेढा : मंगळवेढा आगारातील एसटी कर्मचार्‍यांचा एसटी महामंडळाचे विलगीकरण शासकीय सेवेत करावे, या मागणीवर ठाम असल्याने गेले महिनाभर सुरु असलेला संप (ST Workers Strike) अद्यापही कायम असून, २१० चालक-वाहकांपैकी १५ कर्मचार्‍यांना आत्तापर्यंत निलंबित (ST Workers Suspended) करण्यात आल्याचे एसटीच्या सुत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, मागील तीन दिवसापासून केवळ मंगळवेढा-पंढरपूर या मार्गावर दोन कर्मचार्‍याकरवी एस.टी.बस सेवा सुरु आहे.

    मंगळवेढा आगारात जवळपास २१० चालक-वाहक कर्मचार्‍यांची संख्या असून, २९ ऑक्टोबरपासून या कर्मचार्‍यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. शासनाने पगारवाढीची मागणी मान्य केली असतानाही कर्मचार्‍यांनी एसटी महामंडळाचे शासकीय सेवेत परिवर्तन करावे, या मागणीसाठी अद्यापही संप सुरुच ठेवला आहे. परिणामी, परिवहन मंत्र्यांनी कामावर येण्याचे वेळोवेळी आवाहन करूनही कर्मचार्‍यांनी न जुमानता आपल्या न्याय हक्कासाठी संपाचे आंदोलन मागण्या पूर्ण होईपर्यंत चालूच ठेवण्याचा निर्धार घेतल्याचे कर्मचार्‍यांकडून सांगण्यात आले. यापूर्वी सहा कर्मचारी निलंबित करण्यात आले होते.

    मागील दोन दिवसांपूर्वी पुन्हा नव्याने ९ कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत. २१० कर्मचार्‍यांपैकी ३२ कर्मचारी कामावर आले असल्याचा दावा एसटीच्या सूत्रांनी केला आहे. तर कर्मचारी वर्गांकडून केवळ दोनच कर्मचारी कामावर असल्याचे सांगितले जात आहे. दोन कर्मचार्‍यांमार्फत मागील तीन दिवसांपासून पंढरपूर मार्गावर एसटी बस वाहतूक सुुरू असून, प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात आले.