राज्याच्या राजकारणाला सुरुंग! जिल्ह्यातील तीन डिटाेनेटरचा वापर?

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला सुरुंग लावल्याने राज्याच्या राजकारणात फार माेठया उलथापालथींना ऊत आला आहे. गुजरात राज्यातील सुरत-अहमदाबाद येथे शिंदे हे सुमारे ३५ आमदारांना साेबत घेऊन गेले आहेत.

  आविष्कार देसाई, रायगड : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला सुरुंग लावल्याने राज्याच्या राजकारणात फार माेठया उलथापालथींना ऊत आला आहे. गुजरात राज्यातील सुरत-अहमदाबाद येथे शिंदे हे सुमारे ३५ आमदारांना साेबत घेऊन गेले आहेत. त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील अलिबागचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी, महाडचे आमदार भरत गाेगावले आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांचा समावेश असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून त्यांच्या घराची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
  राज्याच्या राजकारणाला सुरुंग लावण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी सुमारे ३५ आमदारांना साेबत घेतले. त्यामध्ये रायगडमधील तीन आमदारांचा वापर करण्यात आल्याचे बाेलले जाते. कारण या तीन्ही आमदारांचे फाेनही नाॅट रिचेबल हाेते, तसेच त्यांच्या घरुनही त्यांचा थांगपत्ता लागत नव्हता. शिंदे यांच्या सुरुंग पॅटर्नमुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार चांगलेच अडचणीत आले आहे.
  सस्पेंन्स कमालाची वाढला
  शिंदे यांच्यासाेबत असलेल्या ३५ आमदारांमध्ये अलिबागचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी, महाडचे आमदार भरत गाेगावले आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांचा समावेश असल्याची चर्चा आहे. रायगडमधील तीन आमदार शिंदे यांच्यासाेबत असल्याच्या बातम्यांमुळे तीनही आमदारांच्या घरातील फाेन सातत्याने खणखणत हाेते. त्यांच्या निकटवर्तीयांकडे चाैकशी केली असता, काहीच माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे सस्पेंन्स कमालाची वाढला आहे. संबंधीत आमदारांचे माेबाईल लागत नव्हते. त्यामुळे त्यांच्या घरी शिवसैनिक पाेचण्याची शक्यता असल्याने त्यांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
  जिल्ह्याच्या राजकारणात धुसफूस
  रायगडच्या राजकारणात महाविकास आघाडीतील धुसफूस बऱ्याच वेळा समाेर आली हाेती. रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेसचा एकमेव आमदार आदिती तटकरे यांच्या रुपाने निवडून आला आहे, तर शिवसेनेचे तीन आमदार निवडून आले असताना जिल्ह्याचे पालकमंत्री पद राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या पारड्यात कसे गेले. तेव्हापासूनच खऱ्या अर्थाने कुरबूरी सुरु हाेत्या. मात्र भाजपाला राेखण्यासाठी हे करणे गरजेचे आहे. असे सांगून वेळ मारुन नेण्यात येत हाेती. विकास कामांमध्ये सातत्याने पालकंमत्री आदिती तटकरे यांच्याकडून दुजाभाव केला जात हाेता.  जिल्हा नियाेजन समितीच्या निधी वाटपातही शिवसेनाला झुकते माप दिले जात नव्हते. त्यामुळे तीन्ही आमदार कमालीचे संतप्त झाले हाेते.
  वरिष्ठांनीच टोचले कान
  मध्यंतरी अलिबाग येथील उसर येथे उभारण्यात येत असलेल्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या भूमिपूजन प्रसंगी शिवसेना आमदारांनी दांडी मारली हाेती. यातील विशेष बाब म्हणजे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्तेच हा भूमिपूजन साेहळा पार पडला. त्यावेळी शिवेसेनाचा नेता फिरकला नाही. त्यावेळी भाषणामध्ये मुख्यमंत्री ठाकरे यांनी पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या कार्याचे काैतुक केले हाेते. त्यामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या आदिती तटकरे यांना विराेध करणाऱ्या आमदार भरत गाेगावले, महेंद्र दळवी, महेंद्र थाेरवे यांच्यासाठी पक्ष नेतृत्वाकडून थेट कान टाेचण्यात आल्याचे स्पष्ट झाले हाेते.

  काेणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, महाडचे आमदार भरत गाेगावले, कर्जतचे आमदार महेंद्र थाेरवे या तीन्ही आमदारांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आल्या आहे.

  -अशाेक दुधे, जिल्हा पाेलीस अधीक्षक, रायगड