लोकसभा आणि विधानसभेच्या तयारीला लागा, तेच ते चेहरे बघून आता कंटाळा आला;  खा. सुप्रिया सुळे यांचे सुतोवाच

काही लोक दोन्ही दगडावर पाय ठेवतात., इकडे विकासाचा निधी मिळेल तर इकडे मते मिळतील. त्यामुळे आधी विकासाचा निधी काढून घेतो आणि निवडणुकीच्या वेळी इकडे येऊन मते घेतो. ‘ऐसा अभी नही चलेगा’ तुम्ही यांच्या गेममध्ये अडकू नका. लोकसभा आणि विधानसभेच्या तयारीला लागा.

    कुर्डुवाडी :  काही लोक दोन्ही दगडावर पाय ठेवतात., इकडे विकासाचा निधी मिळेल तर इकडे मते मिळतील. त्यामुळे आधी विकासाचा निधी काढून घेतो आणि निवडणुकीच्या वेळी इकडे येऊन मते घेतो. ‘ऐसा अभी नही चलेगा’ तुम्ही यांच्या गेममध्ये अडकू नका. लोकसभा आणि विधानसभेच्या तयारीला लागा. आपल्या सर्वांना तेच ते चेहरे बघून कंटाळा आलाय, बास झालं आता, असे सुतोवाच खा. सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात केले.
    मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार विनायकराव पाटील होते. यावेळी व्यासपीठावर रोहिणी खडसे, अभिजित पाटील, संजय पाटील घाटणेकर, बळीराम साठे, अभिजीत पाटील, बाळासाहेब पाटील, औदुंबर देशमुख, आशा टोणपे, दत्ताजी गवळी, अनुराधा  गवळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक संजय पाटील घाटणेकर यांनी केले. यावेळी कविता म्हेत्रे, बाळासाहेब पाटील, औदुंबर देशमुख, संतोष वारे व अभिजीत पाटील यांची भाषणे झाली. सुत्रसंचालन सुधीर क्षीरसागर यांनी तर आभार दत्ताजी गवळी यांनी मानले.
    खा. सुळे म्हणाल्या, या सरकारमध्ये सरकार आहे की नाही हाच एक मोठा मुद्दा आहे. चव्हाण साहेबांचा उल्लेख करताना आम्ही नेहमी म्हणायचो जेंव्हा जेंव्हा हिमालयाला अडचण आली तेंव्हा तेंव्हा महाराष्ट्राचा सह्याद्री मदतीला धावून आला, हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. याचा मला स्वाभिमान आहे. चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला होता. तेंव्हा त्यांनी भारतासाठी आणि महाराष्ट्रासाठी एक उर्जा दिली होती. त्याच संस्कारावर गेली साठ दशक ज्येष्ठ नेते पवार तेच संस्कार तेच विचार घेऊन भारतभर काम करत आहेत.

    संसदेत बोलतो तेंव्हा ईडीची नोटीस येते
    देशात अनेक बदल झाले, नवीन गोष्ट महाराष्ट्रात आली. ती म्हणजे आईस (आयसीई) आईस म्हणजे बर्फ पण दिल्लीत भाजप सरकार आल्यापासून अर्थ बदलला आहे आय म्हणजे  इन्कमटॅक्स, सी म्हणजे सीबीआय, ई म्हणजे इडी. दहा वर्षापूवी इडी आणि सीबीआय कोणाला माहिती नव्हती.पण आज लहान लहान पोरं भांडताना सुद्धा म्हणतात ये भांडू नको नाहीतर इडी लागुन जाईल. यामुळे या आईस चा जो खेळखंडोबा चालू केलाय न या सरकारन विरोधात बोलला की तुमचा आईस झाला.हे माझ्या बाबतीतही होतं मी जेंव्हा जेंव्हा संसदेत विरोधात बोलते त्यावेळी माझ्या नवऱ्याला लगेच इन्कमटॅक्सची नोटीस येते. नवऱ्यावचा लगेच फोन येतो इनकमटॅक्स का लव्ह लेटर आ गया. मला भाजपला एकच सांगायचय सुप्रिया सुळेची ताकद  माझी इमानदारी आहे.

     महिलांनी मनात आणलं तर तुम्हाला हद्दपार करतील
    प्रेमानं बोलवलं ना सगळं देऊन टाकलं असत. खाली हात आये थे खाली हात जायेंगे काय पक्ष काय पाहिजे ते कोणालाही देऊन टाकलं असत. पण वडिलांच्या हातून हिसकावून घेतलं ना तर नाही देणार, तुम्ही जर माझ्या हातातून हिसकावून घेणार असाल खोटेनाटे आरोप करणार असाल तर नाही चालणार. महिलेवर जेंव्हा घात होतो ना ती पदर बांधून जेंव्हा उभी राहाते तेंव्हा शंभर नाही तर हजार पुरुषांना लढायचे बळ तिला मिळते हा महाराष्ट्राचा नाही तर भारताचा इतिहास आहे. त्यामुळं सांगते बायकांच्या नादी लागू नका एकदा का या राज्याच्या महिलांनी मनात आणलंना लाटणं घेऊन हद्दपार करतील.

    येत्या निवडणुकीत यांचा करेक्ट कार्यक्रम करूया
    भाजपा म्हणते साठ वर्षात तुम्ही काय केलं. साठ वर्षात तुम्ही ज्या शाळा आणि काॅलेजात शिकलात ना ते राष्ट्रवादी आणि काँग्रसने दिल. तुम्ही किती शाळा आणि काॅलेज काढली त्याचा हिशेब सांगा. या ट्रिपल इंजिन, खोके सरकारने शाळा कमी केल्या आणि दारुची दुकानं वाढवली. तम्हाला शाळा पाहिजे की दारुची दुकान हे तुम्ही ठरवा तुम्हाला शाळा पाहिजे असेल तर २०२४ मध्ये लोकसभा आणि विधानसभेमध्ये यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याचा निर्धार आपण करुया.

    आमचे सरकार आल्यास पाच कलमी कार्यक्रम
    हे ट्रिपल इंजिन खोके सरकार काँट्रॅक्ट बेसिसवर अधिकाऱ्यांच्या नेमणूका करतय म्हणजेच त्यांना आरक्षणाचा रस्ता बंद करायचा आहे. हा संविधानाचा अपमान आहे. २०२४ मध्ये आमचे सरकार येणार. त्यामध्ये पाच कलमी कार्यक्रम घेऊन येणार शेतकऱ्यांच्या प्रत्येक मालाला हमीभाव, प्रत्येक महिला व मुलींना सुरक्षिततेची हमी , हक्काची आणि मोफत शाळा, प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी  व संपूर्ण राज्यातील जुन्या एस. टी बसेस काढून नव्या घेणार असा पाच कलमी कार्यक्रम त्यांनी जाहीर करीत सेवा सन्मान आणि स्वाभिमानाचे सरकार असेल असे खा. सुळे म्हणाल्या.

     सगळं पवार साहेबांनी दिलयं …
    याच कार्यालयात याच ठिकाणी मी देखील एका कार्यक्रमाला याठिकाणी उपस्थित होतो. ज्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने आणि पवार साहेबांनी सगळं काही दिलं तेच याच व्यासपीठावरती इथे उभा राहून रडले होते. मला सगळं काही पवार साहेबांनी दिलंय आता मला कशाचीही गरज नाही. मी कधीही त्यांना सोडून जाणार नाही असं म्हणले होते. याची आठवण विठ्ठल सह साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी विद्यमान आमदारांचे नाव न घेता उपस्थितांना व खा. सुप्रिया सुळे यांना करुन दिली.