राज्याचे बहुजन विकास मंत्री विजय वडेट्टीवार एका नव्या ओबीसी संघटनेचे जनक; पाच जानेवारीला होणार घोषणा

आगामी काळात ओबीसी समाजाच्या राजकारणाला वेग येणार असल्याचे हेरून आणखी एका नव्या ओबीसी संघटनेची स्थापना केली जात आहे. येत्या पाच जानेवारीला मुंबईत या संघटनेची घोषणा होईल. राज्याचे बहुजन विकास मंत्री विजय वडेट्टीवार हेच या नव्या संघटनेचे जनक असल्याचे सांगितले जात आहे.

    मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्या निमित्ताने ओबीसींच्या राजकीय सामाजिक आरक्षणाला धोका निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण टिकवण्यासाठी लागणारा ईम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी ४३५ कोटी रुपये यंदाच्या हिवाळी अधिवेशनात मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे आगामी काळात या समाजाच्या राजकारणाला वेग येणार असल्याचे हेरून आणखी एका नव्या ओबीसी संघटनेची स्थापना केली जात आहे.

    दरम्यान येत्या पाच जानेवारीला मुंबईत या संघटनेची घोषणा होईल. राज्याचे बहुजन विकास मंत्री विजय वडेट्टीवार हेच या नव्या संघटनेचे जनक असल्याचे सांगितले जात आहे.

    नावाबाबत पाच जानेवारीलाच ओबीसी मेळव्यात घोषणा

    ओबीसींच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी राज्यात अनेक संघटना असताना नव्याने ओबीसी संघटनेची स्थापना करत समाजाच्या प्रश्नाना वाचा फोडण्याचे काम केले जाणार आहे. येत्या पाच जानेवारीला मुंबईत एका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला राज्यभरातून ओबीसी समाजाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. तसेच या संघटनेला मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांचे मार्गदर्शन असल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, या संघटनेची भूमिका काय ? तिच्या माध्यमातून कोणत्या प्रश्नांवर काम केले जाणार तसेच या संघटनेची काही राजकीय भूमिका आहे का ? याबाबत तसेच नव्या संघटनेच्या नावाबाबत पाच जानेवारीलाच ओबीसी प्रतिनिधींच्या मेळव्यात घोषणा केली जाणार आहे.