विद्युत पुरवठा खंडीत करण्याची मोहीम तात्काळ थांबवा : प्रशांत परिचारक

शेतकऱ्यांकडून छोट्या, मोठ्या व्यवसायिकांकडून महावितरण थकीत वीज बिलांची सक्तीने वसुली करत आहे. वीज बिल न भरल्यास वीज तोडली जात आहे. ही कटू कारवाई थांबवावी या मागणीसाठी पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील शेतकऱ्यांनी मोटरसायकल रॅली काढत महावितरण कार्यालय गाठले आणि ठिय्या मारत आंदोलन केले.

    पंढरपूर : शेतकऱ्यांकडून छोट्या, मोठ्या व्यवसायिकांकडून महावितरण थकीत वीज बिलांची सक्तीने वसुली करत आहे. वीज बिल न भरल्यास वीज तोडली जात आहे. ही कटू कारवाई थांबवावी या मागणीसाठी पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील शेतकऱ्यांनी मोटरसायकल रॅली काढत महावितरण कार्यालय गाठले आणि ठिय्या मारत आंदोलन केले. यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी शेतकऱ्यांवर महावितरणची वीज तोडण्याची कारवाई त्वरित थांबवावी, अशी मागणी आमदार प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) यांनी केले. यावेळी शेतकऱ्यांनी महावितरणच्या कारवाईच्या विरोधात आक्रमक भूमिका मांडत आंदोलनाचा इशारा दिला. यावेळी कासेगाव परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

    पंढरपूर तालुक्यात ऊस, केळी, डाळींब, द्राक्षे आदी पिकांना पाणी देणे गरजेचे असते. मात्र, महावितरणकडून थेट कनेक्शन कट केले जात असल्यामुळे शेतकरी वर्ग प्रचंड अडचणीत सापडला आहे. गेल्या दोन वर्षांपासून आर्थिक संकटाचा सामना करताना कसा बसा टिकून राहिलेला शेतकरी महावितरणाच्या या मोहिमेमुळे उद्धवस्त होणार आहे. त्यांना गंभीर संकटाचा सामना करावा लागणार आहे. जर तात्काळ ही मोहिम थांबवली नाही तर उग्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा महावितरणाचे कार्यकारी अभियंता यांना देण्यात आला आहे.

    यावेळी लक्ष्मणराव धनवडे, प्रशांत देशमुख, सुभाष मस्के, विक्रम शिरसट, भास्कर कसगावडे, हरिभाऊ गावंधरे, विजय देशमुख, प्रकाश बाबर यांच्यासह कासेगाव परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच या आंदोलनाला राजकीय नेत्यांनी सहभाग नोंदवत पाठिंबा दिला.