एसटीचे काम संथ गतीनेच; ५० टक्के कर्मचारी पुन्हा संपावर गेल्याचा आंदोलकांचा दावा

एसटीच्या नागपूर विभागात बुधवारी ३० कर्मचारी रुजू झाल्यामुळे गुरुवारपासून फेऱ्या वाढण्याची आशा व्यक्त करण्यात आली. तशी तयारीही सुरू झाली. असे असतानाच त्यातील ५० टक्के कर्मचारी पुन्हा संपावर गेल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे.

  नागपूर (Nagpur) : एसटीच्या नागपूर विभागात बुधवारी ३० कर्मचारी रुजू झाल्यामुळे गुरुवारपासून फेऱ्या वाढण्याची आशा व्यक्त करण्यात आली. तशी तयारीही सुरू झाली. असे असतानाच त्यातील ५० टक्के कर्मचारी पुन्हा संपावर गेल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. गुरुवारी फेऱ्या बऱ्यापैकी सुरू झाल्या असल्या, तरी एसटीने अजून हवा तसा वेग पकडलेला नाही.

  एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे, यासाठी दिवाळीपासून राज्यात कर्मचारी संपावर गेले आहेत. कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचारी संघटनेने या संपाची हाक दिली होती. सुरुवातीला भाजपचे नेतेही या आंदोलनात सहभागी झाले. त्यामुळे राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले. सरकारने कर्मचाऱ्यांना वेतनवाढ दिल्यानंतर भाजपचे नेते या आंदोलनातून बाहेर पडले. त्यानंतर कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचारी संघटनेतर्फे आंदोलन सुरूच होते. याच आठवड्यात परिवहनमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजयकुमार गुजर यांनी संप समाप्तीची घोषणा केली. त्यामुळे आता कर्मचारी कामावर परततील, असे वाटत असतानाच कर्मचारी मात्र संभ्रमात असल्याचे चित्र होते.

  अनेक ठिकाणी काही कर्मचारी कामावर परत येत होते. नागपूर विभागात मंगळवारी तीन, तर बुधवारी ३० कर्मचारी रुजू झाले. त्यामुळे एसटीच्या फेऱ्या वाढतील, असा अंदाज असतानाच बुधवारी रुजू झालेले ५० टक्के कर्मचारी गुरुवारी कामावर हजरच झाले नसल्याची माहिती आहे. त्यामुळे ज्या क्षमतेने एसटी धावेल असे वाटत होते, तशी ती तूर्तास सुरू झालेली नाही. ‘काही कर्मचारी कामावर रुजू झाले होते. मात्र, आमचे जे सहकारी मृत्यू पावले, त्यांच्याबद्दल आम्ही दुखवटा पाळत आहोत. आता ५ जानेवारीपर्यंत आमचा दुखवटा सुरू राहणार आहे. रुजू झालेल्यांपैकी ५० टक्के कर्मचारी पुन्हा या दुखवट्यात सहभागी झाले आहेत’, असा दावा आंदोलक कर्मचाऱ्यांनी ‘मटा’शी बोलताना केला.

  दरम्यान, एसटी प्रशासनाने मात्र २१ ते २३ डिसेंबर या तीन दिवसांत ३९ कर्मचारी कामावर रुजू झाल्याचे कळविले आहे. ते रुजू झाले हे खरे असले तरी नंतर त्यातील अनेकजण प्रत्यक्ष कामावर हजर झालेले नाहीत, ही त्याची दुसरी बाजू असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.

  एक लाखावर उत्पन्न
  कर्मचारी आंदोलन सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच नागपूर विभागाचे उत्पन्न गुरुवारी एक लाख रुपयांवर गेले. या एकाच दिवशी एसटीला १ लाख १० हजार ३३४ रुपयांचे उत्पन्न झाले. गुरुवारी १७ बसेसनी ४८ फेऱ्या केल्या व याद्वारे १,७९२ प्रवाशांनी प्रवास केला, असे प्रशासनाने कळविले आहे.