बिहारमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन, केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला होतोय विरोध

'अग्निपथ' योजनेअंतर्गत लष्करात भरती होणाऱ्या सैनिकांना 'अग्नवीर' असं नाव देण्यात येणार आहे. येत्या ऑगस्ट महिन्यापासून ही भरती होण्याची शक्यता आहे.

    केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेच एकीकडे स्वागत होत आहे तर दुसरीकडे काही प्रमाणात विरोध होताना दिसत आहे. बिहारमध्ये या योजनेला विरोध होत असून काही विद्यार्थी आक्रमक झाले आहे. बक्सरमध्ये काही जणांकडून रेल्वेवर दगडफेक केल्याची माहिती आहे. तर मुझफ्फरपूरमध्येही आंदोलन सुरू आहे.

    आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास मोठ्या संख्येने युवक बक्सर रेल्वे स्थानकाजवळ पोहचले होते. त्यानंतर त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी जोरदार घोषणाबाजी झाली आणि रेल्वे रुळावर आंदोलकांनी ठाण मांडले. या आंदोलनामुळे जनशताब्दी एक्स्प्रेस जवळपास एक तास थांबली. या दरम्यान काही विद्यार्थ्यांनी पाटणा येथे जाणारी पाटलीपुत्र एक्स्प्रेसवर दगडफेक केली. रेल्वे पोलिसांकडून रेल्वे रुळावरून आंदोलकांना हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. केंद्र सरकारने जाहीर केलेली योजना चुकीची असल्याचा आक्षेप विद्यार्थ्यांनी घेतला आहे. केंद्र सरकार फक्त चार वर्षांसाठी सैन्यात दाखल करून घेणार, त्यानंतर निवृत्ती स्वीकारण्यास सांगणार आहे. त्यानंतरच्या आयुष्यात काय करणार असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

    काय आहे अग्निपथ योजना

    ‘अग्निपथ’ योजनेअंतर्गत लष्करात भरती होणाऱ्या सैनिकांना ‘अग्नवीर’ असं नाव देण्यात येणार आहे. येत्या ऑगस्ट महिन्यापासून ही भरती होण्याची शक्यता आहे. ‘टूर ऑफ ड्युटी’च्या धर्तीवर ही योजना तयार करण्यात आली असून त्यामध्ये सैनिकांना केवळ चार वर्षे सैन्यात सेवा करण्याचा पर्याय देण्यात येणार आहे.