खांडवीच्या मुलींची शिष्यवृत्तीत सरशी; जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची शंभर टक्के निकालाची हॅट्ट्रिक

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत १२ ऑगस्ट २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत खांडवी येथील मुलींच्या शाळेतील इयत्ता पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती पात्र झाल्या आहेत.

    बार्शी / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : तालुक्यातील खांडवी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलींच्या शाळेचा सलग तिसऱ्या वर्षीही शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत १२ ऑगस्ट २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत खांडवी येथील मुलींच्या शाळेतील इयत्ता पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती पात्र झाल्या आहेत.

    शाळेने सलग तीन वर्षे शिष्यवृत्ती परीक्षेत 100 टक्के यश मिळवले आहे. सन 2018- 19 मध्ये ६ विद्यार्थिनी शिष्यवृत्ती पात्र ठरल्या होत्या व त्यातील २ विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत झळकल्या होत्या. 2019-20 मध्ये ७ विद्यार्थिनी शिष्यवृत्ती पात्र ठरल्या व त्यातील ३ विद्यार्थिनी जिल्हा गुणवत्ता यादीत झळकल्या होत्या.

    सर्व विद्यार्थिनींना वर्गशिक्षिका शितल संकपाळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापिका नसीमबानू मुजावर यांनीही मार्गदर्शन केले. शाळेतील शिक्षक सुधाकर मिरगणे, लक्ष्मण ताकभाते, नागनाथ सातपुते, बालाजी जाधव, विद्या गावडे, अल्पना पाटील यांचेही मार्गदर्शन लाभले.

    शाळेच्या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी एल. एस. जाधव, माजी केंद्रप्रमुख तिकटे, केंद्रप्रमुख सिंधू गिलबिले व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश बारंगुळे यांनी अभिनंदन केले.