मुंबईत नवजात बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया; जन्मजात व्यंगापासून केली सुटका

भायखळा येथील शहनाज ( वय ३४) या गर्भवती महिलेला ३२ आठवड्यांच्या नियमित तपासणीदरम्यान बाळाच्या आतड्यांमध्ये अडथळा असल्याचे समजले. या आजाराला ‘‘डुओडेनल एट्रेसिया’’ असे म्हणतात. फारच दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या या आजारात आतड्यांचा प्रारंभिक भाग तयार होत नाही.

  • हाजी अली येथील एसआरसीसी चिल्ड्रन रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया

मुंबई : भारतामध्ये एक हजार नवजात बालकांपैकी ८ ते १० बालकांना जन्मजात आजार असल्याचे आढळते त्यामुळे प्रसुती होताना माता व अर्भकाची काळजी घेऊन वैद्यकीय निर्णय घ्यावे लागतात. कधीकधी निर्णय घेताना व वैद्यकीय उपचारास थोडासा जरी विलंब झाला, तर माता व अर्भकाच्या जीवाला धोका निर्माण होतो.

कोरोनाच्या महामारीचा विचार करता नवजात बालकाची व मातेची काळजी घेणे फार गरजेचे आहे. अशीच एक जटिल व दुर्मिळ शल्यचिकित्सा हाजी अली येथील एसआरसीसी चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये एका नवजात बालकावर करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर बाळाची प्रकृती ठिक असल्याचे डाॅक्टरांकडून सांगण्यात आले.

‘डुओडेनल एट्रेसिया’ दुर्मिळ आजार

भायखळा येथील शहनाज ( वय ३४) या गर्भवती महिलेला ३२ आठवड्यांच्या नियमित तपासणीदरम्यान बाळाच्या आतड्यांमध्ये अडथळा असल्याचे समजले. या आजाराला ‘‘डुओडेनल एट्रेसिया’’ असे म्हणतात. फारच दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या या आजारात आतड्यांचा प्रारंभिक भाग तयार होत नाही. त्यामुळे तांत्रिक अडथळा येऊन दूध व पाचक द्रव्य पदार्थ पुढे जाण्यास अडथळा निर्माण होतो. या केसमध्ये या सर्व बाबींचा विचार करून गर्भवती मातेला पुढील दोन महिने एसआरसीसी चिल्ड्रन रुग्णालयामध्ये योग्यरीत्या हाताळण्यात आले, अशा केसमध्ये अनेकवेळा बालकांमध्ये व्यंग निर्माण होण्याचा अथवा दगावण्याचा धोका असतो.

जन्माला आल्यानंतर २४ तासातच शस्त्रक्रिया

याबाबत एसआरसीसी चिल्ड्रन हॉस्पिटलचे बालरोग शस्त्रक्रिया ज्येष्ठ तज्ज्ञ डॉ. रसिक शहा म्हणाले,‘‘ बाळ जन्माला आल्यानंतर २४ तासामध्ये आम्ही त्याच्या ओटीपोटावर लॅप्रोस्कोपिक तंत्रज्ञानाद्वारे शस्त्रकिया केली. या शस्त्रक्रियेनंतर पाच दिवसांनी मोठ्या आतड्यातून लहान आतड्यांमध्ये चांगला प्रवाह आम्हाला दिसून आला म्हणजेच बाळाची पचनसंस्था सुरळीत सुरु झाली होती व नंतर बाळाला तोंडावाटे आहार देण्यास सुरुवात केली व ११ व्या दिवशी त्याला पूर्ण आहार सुरु करून त्याला घरी सोडण्यात आले.

देशात जन्मजात व्यंगाचे प्रमाण हे ३.६ टक्के

आपल्या देशामध्ये जन्मजात व्यंगाचे प्रमाण हे ३.६ टक्के आहे व यापैकी ५० टक्के बालके रुग्णालयामध्ये पोहचतच नाही. या शल्यचिकित्सेसाठी डॉ. रवी रामद्वार वरिष्ठ सल्लागार, बालरोग शस्त्रक्रिया , डॉ. नंदिनी वरिष्ठ सल्लागार आणि प्रमुख, पेडियाट्रिक ऍनेस्थेसिया, डॉ. विनित समदानी सल्लागार बालरोग तज्ज्ञ व डॉ. रसिक शहा अशा तज्ज्ञ टीमने ही शल्यचिकित्सा यशस्वीरीत्या पार पडली.

एसआरसीसी चिल्ड्रन हॉस्पिटल हे मुंबईतील अत्याधुनिक तंत्रज्ञानानी सुसज्ज असून नवजात बालकांसाठी आधुनिक उपचार उपलब्ध आहेत. या हॉस्पिटलमध्ये छोट्या बालकानावर व नवजात बालकांवर अत्यंत दुर्मिळ यशस्वी शल्यचिकित्सा हाेत असते.