पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखाने येणार मदतीला; मराठवाड्यातील ऊसतोडीचा प्रश्न मार्गी लागणार?

  उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांची मदत घेतली जाणार आहे. यासंदर्भातला प्रस्ताव थेट साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना देण्यात येणार आहे.

  दरम्यान जर आयुक्तांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली तर उस्मानाबाद जिल्ह्यातील ऊसतोडीचा प्रश्न मार्गी लागणार आहे असे आ. राणाजगजीतसिंह पाटील यांनी सांगितले.

  मराठवाड्यात सर्वाधिक अतिरिक्त ऊस 

  काळानुसार मराठवाड्यातही ऊसाचे क्षेत्र वाढलेले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये 11 साखर कारखान्यांच्या माध्यमातून ऊसाचे गाळप झाले असले तरी ऊस शिल्लक आहे. विशेष म्हणजे साखर कारखान्यांनी क्षमतेपेक्षा अधिकचे गाळप करुनही हीच अवस्था असल्याचे दिसत आहे.

  आमदार राणाजगजीतसिंह पाटील नेमकं काय म्हणाले? 

  सध्या पश्चिम महाराष्ट्रातील ऊसाचे गाळप झाल्यात जमा आहे. तसेच जे शिल्लक क्षेत्र आहे त्याची तोडही वेळेत होईल पण, येथील यंत्रणा मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या कामी नाही आली तर शेतकऱ्यांचे न भरुन निघणारे नुकसान होणार आहे. त्यामुळे अतिरिक्त ऊसाचे गाळप करण्यासाठी सोलापूर येथील कारखान्यांची वाढीव मदत घेण्यात येणार आहे. एवढेच नाही तर साखर आयुक्त स्तरावरुन आदेश निर्गमीत करण्याच्या अनुषंगाने प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय झाला आहे, अशी माहिती आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी दिली आहे.