वर्धनवर बुधवारी ऊस पिक परिसंवाद शेतकरी मेळावा : धैर्यशील कदम

वर्धन ऍग्रोच्या माध्यमातून नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताचे आणि सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबविण्यात येतात. शेतीतील आव्हाने पेलण्यासाठी करावयाच्या उपाययोजना याकरिता परिसंवाद मेळावा फायदेशीर ठरेल. सर्व शेतकरी बांधवांनी या संधीचा लाभ घ्यावा.

    औंध : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी तसेच शेती करताना येणाऱ्या विविध समस्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी वर्धन ऍग्रो प्रोसेसिंग लिमिटेड आणि मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि. २९) कारखाना कार्यस्थळावर ऊस पिक परिसंवाद आणि शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती वर्धन ऍग्रोचे चेअरमन धैर्यशील कदम यांनी कारखाना कार्यस्थळावर पत्रकारांना दिली.

    ते पुढे म्हणाले, या ऊस परिसंवादामध्ये डॉ. भरत रासकर, डॉ. संजीव माने, डॉ. सुभाष घोडके, डॉ. दत्तात्रय थोरवे, डॉ. किरण ओंबासे या ऊस विशेषतज्ञाचे आधुनिक ऊस लागवड तंत्रज्ञान, खोडवा व्यवस्थापन, आंतरपिके, तणनियंत्रण, बियाणे, रोग व किड नियंत्रण आदी विषयांवर मार्गदर्शन होणार आहे. तसेच सद्यस्थितीत अति रासायनिक खतांचा वापर होत असल्याने जमिनीची सुपीकता खालावली असून, उत्पादन क्षमतेवरही परिणाम होत आहे. या सर्व गोष्टींचा अभ्यास करून वर्धन ऍग्रो कारखान्याने वर्धन नॅचरल या दाणेदार सेंद्रिय खताची निर्मिती केली आहे. हे खत प्रेसमड व नैसर्गिक घटकांपासून बनविण्यात आलेले आहे या खताचा वापर केल्याने इतर कोणतेही खत वापरण्याची गरज लागत नाही.

    जमिनीचा कर्ब वाढून पिकाची गुणवत्ता वाढते. चवीत बदल होतो आणि उत्पादन वाढीस चालना मिळते. वर्धन नॅचरल सेंद्रिय खत त्याबरोबरच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची सर्व जैविक औषधांचा विक्री शुभारंभ देखील कारखाना कार्यस्थळावर बुधवारी होणार असल्याचे कदम यांनी सांगितले.

    वर्धन ऍग्रोच्या माध्यमातून नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताचे आणि सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबविण्यात येतात. शेतीतील आव्हाने पेलण्यासाठी करावयाच्या उपाययोजना याकरिता परिसंवाद मेळावा फायदेशीर ठरेल. सर्व शेतकरी बांधवांनी या संधीचा लाभ घ्यावा.

    – विक्रमशील कदम, कार्यकारी संचालक, वर्धन ऍग्रो लिमिटेड.