भाजप उमेदवार राम सातपुते यांचा गंभीर आरोप: म्हणाले, “सुशीलकुमार शिंदे यांनी 12 अतिरेक्यांना वाचवलं”

सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी १२ अतिरेक्यांना वाचवलं असा गंभीर आरोप राम सातपुतेंनी केला.

    सोलापूर : लोकसभा निवडणूक जवळ आल्यामुळे सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आता सोलापूर मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी १२ अतिरेक्यांना वाचवलं असा गंभीर आरोप राम सातपुतेंनी केला. प्रणिती शिंदे यांच्या विरोधात राम सातपुते यांना भाजपाने लोकसभेची उमेदवारी दिली आहे.

    काय म्हणाले राम सातपुते?

    सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना दहशतवाद प्रतिबंधक कायद्यानुसार अडकलेल्या सोलापूरच्या १२ अतिरेक्यांना त्यांनी वाचवलं. सोलापूरच्या मंगळवेढा या ठिकाणी समाधान अवताडे यांनी घेतलेल्या बैठकीत राम सातपुते बोलत होते. त्यावेळी त्यांनी हा गंभीर आरोप केला. राम सातपुते विरुद्ध प्रणिती शिंदे अशी लढत जाहीर झाल्यापासून दोघंही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. माझ्या वडिलांवर टीका करु नका असं म्हणणाऱ्या प्रणिती शिंदेंनाही राम सातपुतेंनी उत्तर दिलं आहे. तुम्ही केवळ माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी आहात म्हणून तुम्हाला तिकिट मिळालं आहे. सोलापूरसाठी तुम्ही काय केलंत? असा प्रश्न राम सातपुतेंनी केला आहे.

    राम सातपुतेंचे गंभीर आरोप

    २००२ मध्ये सरकारने पोटा नावाचा दहशतवादाला प्रतिबंध करणारा कायदा केला होता. सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी सोलापूरमध्ये या पोटा कायद्यान्वये कारवाई करण्यात आलेल्या १२ अतिरेक्यांना वाचवलं आणि लांगुलचालनाचं राजकारण केलं. ज्या बारा अतिरेक्यांना त्यांनी सोडलं त्यांची यादीही माझ्याकडे आहे. सोलापूरचा विकास केला नाही, ते भकास केलं आणि दक्षिण अफ्रिकेत स्वतःचे चहाचे मळे शिंदेंनी सुरु केले असाही आरोव राम सातपुतेंनी केला.