
राज्यातील सर्वांत मोठ्या दुर्गराज गड-किल्ले बांधणी स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पुण्यात कृषी विद्यापीठाच्या मैदानावर भरलेल्या भीमथडी जत्रेत मोठ्या जल्लोषात पार पडला. सांगलीच्या 'स्वराज्य दौलत दुर्गराज प्रतिष्ठान'ने ५१ हजारांचे प्रथम पारितोषिक पटकावले.
बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : राज्यातील सर्वांत मोठ्या दुर्गराज गड-किल्ले बांधणी स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पुण्यात कृषी विद्यापीठाच्या मैदानावर भरलेल्या भीमथडी जत्रेत मोठ्या जल्लोषात पार पडला. सांगलीच्या ‘स्वराज्य दौलत दुर्गराज प्रतिष्ठान’ने ५१ हजारांचे प्रथम पारितोषिक पटकावले. तर नागपूरच्या शिवमुद्रा प्रतिष्ठानने ३१ हजारांचे द्वितीय आणि देहू येथील क्रांतिवीर मित्र मंडळाने २१ हजारांचे तिसरे पारितोषिक पटकावले.
दिवाळीच्या काळामध्ये राज्यस्तरावर वेगवेगळ्या गटांत घेण्यात आलेली ही राज्यातील सर्वात मोठी ऑनलाईन गडकिल्ले बांधणी स्पर्धा होती. यामध्ये संपूर्ण राज्यभरातून तब्बल १४९३ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी किती किल्ले बांधले, स्वराज्य निर्माण करताना त्यांनी कसा पराक्रम गाजवला आणि त्यांचे कार्य नवीन पिढीला समजावे तसेच त्यांच्यातील कला गुणांना वाव मिळावा या उद्देशाने ‘सृजन’ व्यासपीठाच्या माध्यमातून ही स्पर्धा घेण्यात आली होती. संपूर्ण राज्यभरातून या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये सहभागी झालेल्या सर्वच स्पर्धकांनी बनवलेले किल्ले एकापेक्षा एक सरस आणि परिक्षकांचीच परीक्षा पहायला लावणारे होते. अशा परिस्थितीत डाॅ. प्रमोद बोराडे आणि डाॅ.सचिन जोशी या परीक्षकांनी हे अवघड काम पूर्ण केले.
पुण्यात भीमथडी जत्रेत जल्लोषात या स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. पारितोषिक स्वीकारण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक संघाचा उत्साह यावेळी पाहण्यासारखा होता.
शिवछत्रपतींच्या दैदिप्यमान इतिहासाची माहिती मिळण्यासोबतच संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी या स्पर्धेचा उपयोग होईल, अशी अपेक्षा यावेळी आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली. तसेच बक्षीस न मिळालेल्या स्पर्धकांनी नाराज न होता पुढील वर्षी अधिक चांगली तयारी करून स्पर्धेत उतरावे, असे आवाहनही त्यांनी केले.
अन्य विभागांचे निकाल पुढीलप्रमाणे :
मुक्तछंद विभाग: चैतन्य विकास बर्गे, सातारा (प्रथम क्रमांक), संतोष अण्णासाहेब पाथरवट, पुणे (द्वितीय), जय गणेश मित्र मंडळ, पेन (तृतीय).
कर्जत जामखेड विभाग: सारंग शरद शिरसाट, जामखेड (प्रथम),
अनिकेत रोडे, जामखेड (द्वितीय),
प्रतिक कोऱ्हाळे, कर्जत (तृतीय).
बारामतीच्या अग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार, विश्वस्त आणि ‘भिमथडी जत्रेच्या संयोजक सुनंदा पवार, आमदार रोहित पवार यांच्या पत्नी कुंती पवार हेही यावेळी उपस्थित होत्या. सूत्रसंचालन स्वामीराज भिसे यांनी केले.