खेळाडूंनी शिबीरातून मिळालेले संस्कार, स्वयंशिस्त जीवनात अनुकरण करावे : स्वरुपाराणी मोहिते-पाटील

खेळाडूंनी शिबीरातून बाहेर गेल्यानंतर स्वतःच्या शारिरीक तंदुरुस्तीकडे लक्ष द्या. स्वतःच्या शारीरिक, मानसिक तंदुरुस्तीसाठी व्यायामाकडे लक्ष द्या.

    अकलूज : प्रताप क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या दहा दिवसाच्या निवासी क्रीडा प्रशिक्षणातून खेळाडूंना मिळालेले संस्कार, स्वयंशिस्त, स्वावलंबनाचे जीवनात अनुकरण करावे व दररोज व्यायाम करुन तंदुरुस्तीसाठी प्रयत्न करावा. यामुळे शिबीराचा उद्देश सार्थक ठरेल असे प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा स्वरुपाराणी मोहिते-पाटील यांनी सांगितले.

    प्रताप क्रीडा मंडळाचे संस्थापक, अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रताप क्रीडा मंडळाने दिनांक १ ते १० डिसेंबर या कालावधीत आयोजित केलेल्या निवासी प्राथमिक क्रीडा प्रशिक्षण व निवड शिबीरात विद्यार्थी खेळाडूंशी मनमोकळा संवाद साधताना स्वरुपाराणी मोहिते-पाटील बोलत होत्या. यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, सचिव पोपटराव भोसले-पाटील, खजिनदार वसंतराव जाधव, सदस्य यशवंत माने-देशमुख, बिभीषण जाधव, राजेंद्र देवकर, फिरोज तांबोळी यांचेसह सर्व क्रीडा शिक्षक, खेळाडू उपस्थित होते.

    पुढे बोलताना स्वरुपाराणी मोहिते-पाटील म्हणाल्या की, विद्यार्थी खेळाडूंनी शिबीरात शिकलेल्या स्वयंशिस्तीचे व व्यायामाचे आपल्या आयुष्यात सातत्य ठेवावे. चांगले नागरिक बनण्याचा प्रयत्न करावा. प्रताप क्रीडा मंडळाचे संस्थापक, अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील यांनी मागील ४९ वर्षापूर्वी मंडळाची स्थापना केली. सदरच्या शिबीरातून खेळाडूंना खेळाचे प्राथमिक ज्ञान व्हावे, व्यायामाचे महत्व समजावे, त्याचे नियम व कौशल्य समाजावीत या करीता पूर्णपणे मोफत आयोजित केले होते.

    खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंची व्याख्यानेही आयोजित केली गेली. यातून आपण उत्तम खेळाडू होण्यासाठी जिद्द, प्रचंड, मेहनत, एकाग्रता, सातत्य व आत्मविश्वास ठेवावा याचा अनुभव घेतला.

    स्वतःमध्ये आत्मविश्वास ठेवावा व आपणाकडे जे सुंदर आहे त्याचा विचार करुन, त्याचा शोध घेवून आपणातील चांगल्या गुणाला विकसीत करण्यासाठी प्रयत्न करा. यावेळी त्यांनी सुंदर मोराची गोष्ट सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. खेळाडूंनी, विद्यार्थ्यांनी आपल्यातील न्यूनगंड सोडून आपल्यातील सुंदर मोरपिस शोधावा. या शिबीरात ज्यांची निवड झाली नाही त्यांनी नाराज न होता पुन्हा जोमाने प्रयत्न करावेत. सदरचे मोफत शिबीर हे प्राथमिक स्वरुपात होते. यातून ज्यांची निवड झाली आहे, त्यांच्यासाठी जानेवारी २०२२ या महिन्यात प्रताप क्रीडा मंडळाकडून अधिकृत सर्व खेळाचे साहित्य व सुविधा देवून प्रशिक्षण देणार आहोत.

    खेळाडूंनी शिबीरातून बाहेर गेल्यानंतर स्वतःच्या शारिरीक तंदुरुस्तीकडे लक्ष द्या. स्वतःच्या शारीरिक, मानसिक तंदुरुस्तीसाठी व्यायामाकडे लक्ष द्या. एकत्र येवून मित्रांचे ग्रुप करा व व्यायाम करा. रोज किमान ४५ मिनीटाचा व्यायाम महत्वाचा आहे. सदरच्या शिबीराची संकल्पना आदरणीय बाळदादांची आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे मुले घरी होती. त्यांना खेळाची आवड निर्माण व्हावी यासाठी हे शिबीर आयोजित केले असल्याचेही त्यांनी सांगितले.

    यावेळी शिबीरातून मिळालेल्या अनुभवाचे मनोगत खेळाडू उत्कर्षा तोरणे, नैना देवकुळे, तेजस पवार, विजय पवार, आकांक्षा पालकर, पायल काळे, युवराज टोपे, यशराज देवकर आदींनी व्यक्त केले. तर क्रीडा प्रशिक्षक प्रा. अरविंद वाघमोडे यांनी खेळातील विद्यार्थी निवडी, खेळातील प्रकार व अनुभव सांगितले. यावेळी शिबीरातील १० दिवसात विविध खेळाच्या माहिती पुस्तीकेचे मा.कु. स्वरुपाराणी मोहिते-पाटील यांचे हस्ते विद्यार्थी खेळाडूंना वाटप करण्यात आले. सुत्रसंचालन आर.आर.पाटील यांनी केले.

    यावेळी विद्यार्थी खेळाडूंना प्रताप क्रीडा मंडळाने व शिक्षण प्रसारक मंडळाने आयोजित केलेल्या उपक्रमांच्या चित्रफीती दाखविण्यात आल्या.