वेतन वाढीसाठी मागण्यांसाठी स्विगी कर्मचाऱ्यांच्या संप; कंपनीची पुरवठा सेवा ठप्प

    नागपूर (Nagpur) : ऑनलाइन फूड डिलिव्हरी करणाऱ्या ‘स्विगी’च्या डिलिव्हरी बॉयनी वेतनवाढीच्या मुद्द्यावरून शुक्रवारी संप पुकारला. अचानक संप झाल्याने स्विगीची सेवा कोलमडली. तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी काचीपुरा परिसरात आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केले.

    स्विगीचे वार्षिक मूल्य ३.३ अब्ज डॉलर असून भारतातील ५०० शहरांमध्ये विस्तार आहे. स्विगीकडे दरवर्षी सुमारे पन्नास कोटी ऑर्डर येतात. सध्या स्विगीमध्ये २.१ लाखहून अधिक मासिक डिलिव्हरी स्टाफ आहे. कर्मचारी पे-रोलवर नसल्यामुळे त्यांना पीएफ व इतर सुविधांपासून वंचित राहावे लागते. करोनाचे कारण सांगून अनेक कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखविण्यात येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर वेतनवाढ होत नसल्यामुळे ऑनलाइन फूड डिलिव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी स्विगी नागपूर युनियनच्या नेतृत्वात संप पुकारला आहे. त्यामुळे स्विगीची सेवा प्रभावित झाली आहे.

    कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्विगीने डिलिव्हरी बॉयचे पेआउट कमी केले आहे. पेट्रोलचे वाढते दर पाहता पेआउटमधील कपात आर्थिक गणित बिघडविणारी ठरत आहे. २०१७मध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर ७० रुपये होता. तेव्हा या कर्मचाऱ्यांचा ‘बेस पे’ हा तीस रुपये, टच पॉइंट पाच रुपये तर ‘डिस्टन्स पे’ प्रती किलोमीटर आठ रुपये होता. आता पेट्रोलचे दर वाढलेले असताना ‘डिस्टन्स पे’ प्रती किलोमीटर पाच रुपयांवर आला आहे. त्याचप्रमाणे ‘बेस पे’ वीस रुपये झाला आहे. वेतनातील ही कपात जीवघेणी ठरत आहे. त्यामुळे वेतनवाढ देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

    अशा आहेत मागण्या…
    किमान ‘बेस पे’ प्रत्येकी चार किलोमीटर अंतरासाठी ३५ रुपये असावा, प्रती डिलिव्हरी ‘टच पॉइंट’ पाच रुपये, ‘डिस्टन्स पे’ बारा रुपये असायला हवा. त्याचप्रमाणे सुपर झोन हटविण्यात यावा. थर्ड पार्टी नसावी, दहा लाखांचा अपघात विमा मिळावा, तीन लाखांपर्यंतचा वैद्यकीय खर्च कंपनीने करावा, दिवसाकाठी किमान पाचशे रुपये वेतन मिळण्याची हमी असावी, अशा मागण्या संघटनेने केल्या आहेत.