तासगावला अवकाळीने झोडपले! पावसाने द्राक्षबागांना डाऊनी, घडकूजीचा धोका

शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागाला  बुधवारी  पहाटेच्या दरम्यान व दिवसभर कमी अधिक प्रमाणात अवकाळी पावसाने झोडपुन काढले. यामुळे सर्वत्र पाणीच पाणी होत ओढयांना पाणी आले. दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणमुळे  द्राक्षबागांवर डाऊनी रोगाचा हल्ला झाला आहे.

  तासगाव: शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागाला  बुधवारी  पहाटेच्या दरम्यान व दिवसभर कमी अधिक प्रमाणात अवकाळी पावसाने झोडपुन काढले. यामुळे सर्वत्र पाणीच पाणी होत ओढयांना पाणी आले. दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणमुळे  द्राक्षबागांवर डाऊनी रोगाचा हल्ला झाला आहे. तर पावसाच्या पाण्याने घडकुज होण्याची शक्यता आहे. अजून दोन दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने द्राक्षबागायतदार हवालदिल झाले आहेत.

  तासगाव तालुक्याला द्राक्ष पंढरी म्हणून ओळखले जाते. तालुक्यातील हजारो हेक्टर वर द्राक्ष शेती केली जाते. तासगावची उच्च प्रतीची द्राक्षे व बेदाणा देश विदेशात पाठवला जातो. गेल्या तीन वर्षापासून चक्रीवादळ व अवकाळी पावसाने तालुक्यात अक्षरश: थैमान घातले होते. विरळणी, फ्लावरिंग स्टेजला  धुके व ढगाळ हवामानामुळे डाऊनी रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागांवर होत आहे.
  डाऊनी रोगाचा हल्ला रोखण्यासाठी बागायतदार महागडी विविध कंपन्याची औषधे शेतकरी खरेदी करताना दिसत आहे. तर छाटणी न झालेल्या द्राक्ष बागांमध्ये पाणी साचून राहिल्याने काडीतील घड जिरण्याचा धोका आहे. अजून काही दिवस पावसाचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे. काढणीचा खरीपास याचा धोका आहे. तर रब्बीच्या गहू, हरभरा, शाळू पिकांसाठी वातावरण पोषक आहे.

  डाऊनीस हजारो हेक्टर क्षेत्र बळी
  पावसाने द्राक्षाचे घड कुजून गेले तर डाऊनी रोगाच्या फैलावाने हजारो हेक्टर क्षेत्र या रोगास बळी पडण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. सध्या आगाप फळ छाटणी केलेल्या द्राक्ष बागांची पोंगा, विरळनी, फुलोरा तर काही ठिकाणी डिपिंगची अवस्था आहे. या दरम्यान डाऊणीचा फैलाव होण्याची दाट शक्यता असते. त्यातच खराब हवामान व विजांच्या कडकडाटासह पावसाने झोडपल्याने द्राक्ष बागायतदार धास्तावला आहे.

  रब्बीच्या पिकासाठी पोषक वातावरण
  बिघडलेल्या हवामानामुळे मात्र औषध कंपन्याना सुगीचे दिवस आले आहेत. पावसाने काढणीला आलेल्या खरीपाच नुकसान होणार आहे. मात्र रब्बीच्या शाळू, गहू, हरभरा पिकासाठी पोषक वातावरण आहे.