संसदेच्या नव्या इमारतीसाठी वापरण्यात येतय चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील सागवान

ही इमारत भारताचा गौरवशाली इतिहास आणि वर्तमान सांगणारी असणार आहे. त्यामुळे यात चंद्रपूर-गडचिरोली येथील टिकाऊ सागवानाचा वापर अभिमानाचा विषय ठरला आहे.

    चंद्रपूर : देशातील लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरासाठी चंद्रपूरच्या सागवान लाकडाची चौकट असणार आहे. संसदेच्या नव्या इमारतीसाठी (Central Vista)चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील सागवान लाकडाचा पुरवठा होत आहे. राज्याच्या वनविकास महामंडळाच्या बल्लारपूर विभागाने यासाठी ऑगस्ट 2021 पासून 13 हजार घनमीटरफूट सर्वोत्कृष्ट गुणवत्तेचे लाकूड नवी दिल्लीला रवाना केले आहे.

    सेंट्रल विस्टा प्रकल्प पूर्ण क्षमतेने पूर्णत्वास येत असताना याची उभारणी करणाऱ्या टाटा कंपनीने नारसी अँड असोसिएट या कंपनीला अंतर्गत सजावटीचे काम दिले आहे. या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ मंत्राचा जागर लक्षात घेत या वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्पासाठी देश-विदेशातील सर्व सागवान लाकडाची आधी चाचणी घेतली. त्यात मजबुती-चकाकी आणि लाकडी वस्तूचे अभिजात सौंदर्य टिकून राहत असल्याचे सर्व निकष पूर्ण केल्यावर चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील वनविकास महामंडळाच्या सागवान लाकडाला अंतिम पसंती मिळाली.

    हे सागवान गडचिरोलीच्या आलापल्ली क्षेत्रातील असून, देशातील अव्वल दर्जाचे सागवान इथे बघायला मिळते. बल्लारपूर येथे देशातील सर्वात मोठा शासकीय लाकूड आगार असून लिलाव बाजारही आहे. येथेच देशातील सर्वच राज्यातील लाकूड व्यापारी खरेदीसाठी येत असतात. बल्लारपूर येथे नित्याप्रमाणे होणाऱ्या जाहीर लिलाव प्रक्रियेत नारसी कंपनीचे अधिकारी सहभागी झाले. यात आणखी सहा हजार घनफूट लाकूड आगामी काळात मागणीनुसार सेंट्रल विस्टा प्रकल्पासाठी पुरवले जाणार आहे. जगात देखण्या ठरणाऱ्या भारतीय संसदेच्या सेंट्रल विस्टा प्रकल्पात चंद्रपूरच्या सागवान लाकडाला मिळालेले स्थान गौरवास्पद असल्याची भावना व्यक्त होत आहे. ही इमारत भारताचा गौरवशाली इतिहास आणि वर्तमान सांगणारी असणार आहे. त्यामुळे यात चंद्रपूर-गडचिरोली येथील टिकाऊ सागवानाचा वापर अभिमानाचा विषय ठरला आहे.