
आदित्य ठाकरे यांनी या पत्रात दोन प्रमुख मागण्या केल्या आहेत. त्यात लसीकरणासाठी किमान वयोमर्यादा १५ करावी, जेणेकरुन महाविद्यालय आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचे लसीकरण करता येईल.
मुंबई (Mumbai) : जगभरात ओमायक्रॉनचा धोका वाढला असताना मुंबईतही त्याने शिरकाव केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे पर्यावरण मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांना पत्र लिहिले असून त्यानी हे पत्र आपल्या ट्विटर अकाऊंटवरही शेअर केले आहे.
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना तिसरा डोस
आदित्य ठाकरे यांनी या पत्रात दोन प्रमुख मागण्या केल्या आहेत. त्यात लसीकरणासाठी किमान वयोमर्यादा १५ करावी, जेणेकरुन महाविद्यालय आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचे लसीकरण करता येईल. तसेच आरोग्य कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना तिसरा डोस देण्यात यावा, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
कोरोना योद्ध्यांना बुस्टर डोस देण्याची परवानगी
आदित्य ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे की, आपण वेगवेगळ्या डॉक्टरांसोबत चर्चा केली. या चर्चेनंतर असे वाटते की लसीकरणाची वयोमर्यादा १८ ऐवजी १५ करावी, त्यामुळे उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कोरोना संरक्षण कवच पुरवता येईल. तसेच कोरोना योद्ध्यांना बुस्टर डोस देण्याबाबत परवानगी द्यावी असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.
लसींच्या डोसमधील अंतर चार आठवड्यांचे
दोन लसींच्या डोसमधील अंतर चार आठवड्यांचे केले तर जानेवारी २०२२ पर्यंत मुंबईतील सर्व पात्र नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्याचे उद्दीष्ट पूर्ण होईल. सध्या मुंबईत ७३ टक्के लोकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. या मागण्यांसंदर्भात आपल्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे असेही आदित्य ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.