देशातील तीन टॉपच्या आयटी कंपन्यांना गेल्या तिमाहीत १८ हजार कोटींचा नफा, ५० हजारांहून जास्त जणांना दिले रोजगार

तिन्ही कंपन्या गेल्या तिमाहीत नवे ग्राहक आणि व्यवसाय जोडण्यात यशस्वी ठरल्या आहेत. तिन्ही कंपन्यांना एकूम ऑर्डर सुमारे ८० हजार कोटींच्या होत्या. त्यात टीसीएसला सर्वाधिक ५६,२४० कोटींच्या, इन्फोसिसला १८,७२२ कोटींच्या तर विप्रोला ४४४० कोटींच्या ऑर्डर मिळाल्या.

    नवी दिल्ली :  देशातील तीन सर्वात मोठ्या आयटी कंपन्या, टीसीएस, इन्फोसिस आणि विप्रो या कंपन्यांनी बुधवारी आपले डिसेंबरच्या तिमाहीतील आर्थिक परिणाम जाहीर केले. टीसीएस आणि इन्फोसिस यांचे निकाल हे अपेक्षेपेक्षा जास्त चांगले असल्याचे दिसते आहे. तर विप्रोच्या नफ्यात घट झाली आहे. गेल्या तीन महिन्यांत या तिन्ही कंपन्यांनी मिळून ५०,९९४ नवे रोजगार दिले आहेत. म्हणजेच गेले तीन महिने हे रोजगारासाठी चांगले राहिले आहेत.

    गेल्या तिमाहीत या तिन्ही कंपन्यांनी एकत्रितरित्या १८ हजार कोटींचा निव्वळ नफा कमवला आहे. यात सर्वाधिक नखा टीसेसला झाला असून, त्यांची आकडेवारी आहे ९,७६९ कोटी. कंपनीने बायबॅकसोबतच प्रत्येक शेअरवर ७ रुपये अतरिम डिव्हिडिंट देण्याची घोषणाही केली आहे. इन्फोसिसचा नफा आहे ५,८०९ कोटी रुपये. जो अपेक्षेपेक्षा चांगला आहे. विप्रोच्या महसुलात २१ टक्क्यांनी वाढ झाली आहे, मात्र दरवर्षीच्या नप्याचा विचार केल्यास त्यात ८.६७ टक्के घट झाली आहे. तरीही त्यांचा नफा आहे २४१९.८ कोटी रुपये

    तिन्ही कंपन्यांना एकूण ऑर्डर होती ८० हजार कोटींची
    या तिन्ही कंपन्या गेल्या तिमाहीत नवे ग्राहक आणि व्यवसाय जोडण्यात यशस्वी ठरल्या आहेत. तिन्ही कंपन्यांना एकूम ऑर्डर सुमारे ८० हजार कोटींच्या होत्या. त्यात टीसीएसला सर्वाधिक ५६,२४० कोटींच्या, इन्फोसिसला १८,७२२ कोटींच्या तर विप्रोला ४४४० कोटींच्या ऑर्डर मिळाल्या.

    आयटी कंपन्यांच्या या व्यवसाय विस्ताराचा परिणाम रोजगार वाढण्यात झाला आहे. या तिन्ही कंपन्यांनी तीन महिन्यांत ५०,९९४ नवीन नोकऱ्या दिल्या आहेत. यात सर्वाधिक २८,२३८ नोकऱ्या टीसीएसने दिल्यात. यामुळे टीसीएसची एकूण कर्मचारी संख्या ५ लाख ५६ हजार ९८६ झाली आहे. यात दोन लाख महिला कर्मचारी आहेत. कंपनीतील महिलांची संख्या गतीने वाढते आहे.