घरची परिस्थिती बेताची, अनेक अडचणींवर मात करत जावळीतील ‘ती’ सैन्यात; ग्रामस्थांकडून स्वागत

'भारत माता की जय'चा जयघोष आणि सैनिकांच्या वर्दीतील शिल्पाची दमदार कडक 'एन्ट्री'ने गांजे गावातील रस्ते दुमदुमून गेले. सहा महिन्यांपूर्वी शिल्पा चिकणे हिची आसाम रायफलमध्ये निवड झाली होती. त्यानंतर काही दिवसांनी प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी तिला बोलावण्यात आले. हे प्रशिक्षण पूर्ण करून ती मूळगावी आज आली.

    सातारा : छत्रपती शिवराय यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावळी तालुक्यातील गांजे गावात इतिहास घडला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिल्पा चिकणे (Shilpa Chikane) यांनी जिद्द, चिकाटीच्या जोरावर आसाम रायफलमध्ये (Assam Rifles) भरती होऊन प्रथम महिला सैनिक होण्याचा बहुमान प्राप्त केला. शिल्पा चिकणे यांचा ग्रामस्थांनी फुलांच्या वर्षावात जल्लोषात स्वागत केले.

    ‘भारत माता की जय’चा जयघोष आणि सैनिकांच्या वर्दीतील शिल्पाची दमदार कडक ‘एन्ट्री’ने गांजे गावातील रस्ते दुमदुमून गेले. सहा महिन्यांपूर्वी शिल्पा चिकणे हिची आसाम रायफलमध्ये निवड झाली होती. त्यानंतर काही दिवसांनी प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी तिला बोलावण्यात आले. हे प्रशिक्षण पूर्ण करून ती मूळगावी आज आली. त्या निमित्ताने आपल्या गावातील कन्येच्या यशाचा अभिमान ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

    गावातील ग्रामस्थ विशेषतः महिला व युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. गांजे गावातील पांडुरंग चिकणे या दाम्पत्याची ही चौथी कन्या. घरची परिस्थिती बेताचीच. आई वडील शेतकरी. मुलगा नाही म्हणून नाराज असणाऱ्या या कुटुंबात शिल्पाने मुलाची कमतरता भरून काढत मुलाच्या तोडीचे काम केले.

    गांजे गावातून मेढ्याला पायी जात येथील ऍकॅडमीत प्रचंड कष्ट करत शिल्पाने आसाम रायफलमध्ये भरती होण्यासाठी प्रयत्न केले. तिच्या अथक परिश्रमाने आज तिने प्रशिक्षणाचा अवघड टप्पा पार करून आपल्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात केली आहे.