माझ्याकडे भूत येतो आणि जेवण फस्त करून जातो; वाचा काय आहे प्रकरण….

एक भूत दररोज आपल्या घरी येतं आणि आपण तयार केलेलं अन्न फस्त करतं अशी तक्रार घेऊन एक महिला पोलीस ठाण्यात आली. पोलिसांची तिची तक्रार ऐकून घेतली आणि मग...

    भोपाळ (Bhopal) : आपल्या घरी दररोज भूत येतं (Ghost in home) आणि आपल्याला त्रास देतं, अशी तक्रार घेऊन एक महिला पोलीस ठाण्यात (Police complaint) आली. भारताच्या वेगवेगळ्या भागात भूताखेतांच्या वेगवेगळ्या आख्यायिका (Stories of ghosts) ऐकवल्या जातात. अनेकांना वेगवेगळे भास होत असतात आणि त्याच्या कहाण्या भूताच्या नावाने ऐकवल्या जातात. शहरी असो वा ग्रामीण भाग असो, दोन्ही भागात भुताच्या कथा चवीचवीने ऐकल्या जातात. काहींचा त्यावर विश्वास असतो, तर काहीजण केवळ मनोरंजन म्हणून भूताच्या गोष्टी ऐकत असतात. मात्र भूताची तक्रार पोलीस ठाण्यात आल्याची घटना पहिल्यांदाच घडली असावी.

    महिला आली पोलीस ठाण्यात
    मध्यप्रदेशातील बैतूलमध्ये पेशानं इंजिनिअर असणारी एक महिला पोलीस ठाण्यात आली आणि आपल्याला गंभीर तक्रार नोंदवायची असल्याचं तिने सांगितलं. प्रकरण काहीतरी गंभीर असावं, असं समजून पोलीस अधिकाऱ्यांनी तिला बसायला खुर्ची ऑफर केली आणि तिची तक्रार लिहून घेण्यासाठी अधिकारी सज्ज झाले. मात्र जेव्हा महिलेनं आपली कैफियत मांडायला सुरुवात केली, तेव्हा नेमकं काय करावं, हे त्यांनादेखील समजेना.

    महिलेची अजब कैफियत
    आपल्या घरी भूत येतं आणि आपल्या घरातील अन्न फस्त करून जातं, अशी या महिलेची तक्रार होती. रोज आपण आपल्यासाठी स्वयंपाक करुन ठेवतो, मात्र भूत येतं आणि आपण केलेला स्वयंपाक फस्त करून निघून जात असल्याचं ती म्हणाली. हे भूत पांढऱ्या रंगाचे कपडे घालून येतं आणि त्याचे उलटे पायदेखील आपल्याला दिसत असल्याचं महिलेचं म्हणणं आहे.

    दागिन्यांचं वजन घटलं
    हे भूत आपल्या घरी यायला लागल्यापासून आपल्या सर्व दागिन्यांचं वजन घटल्याचं तिनं सांगितलं. आपण दागिने बाजारातून आणताना त्यांचं जे वजन होतं, ते आता राहिलं नसून दररोज थोडं थोडं वजन कमी होऊ लागल्याची तक्रार तिनं नोंदवली आहे.

    महिलेला मानसोपाचारांची गरज
    या महिलेला मानसोपचारांची गरज असल्याचं पोलिसांनी ओळखलं आणि तिला एका मानसोपचार तज्ज्ञांकडे सोपवलं. त्यांच्याकडून उपचार घेतल्यानंतर महिलेला बरं वाटू लागेल आणि तिला होणारे भुतांचे भास थांबतील, अशी पोलिसांना अपेक्षा आहे.