माझ्या मुलाला काही झाले तर त्याला सरकार जबाबदार; रविकांत तुपकर यांच्या आईचा इशारा

    बुलढाणा : स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर हे गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्या राहत्या घरी अन्नत्याग आंदोलन करीत आहेत. यावेळी त्यांच्या अन्नत्याग आंदोलनाला आईने भेट दिली असता तूपकरांची प्रकृती पाहून या मातेने अक्षरशः हंबरडा फोडला, आणि आपला लेक शेतकऱ्यांसाठी लढतोय त्यामुळे त्याची सरकारने तात्काळ दखल घ्यावी अन्यथा त्याच्या जीवाला जर काही बरे वाईट झाले तर याची सर्वस्वी जबाबदारी सरकारवर असेल असा संतप्त इशाराही त्यांनी यावेळी सरकारला दिला आहे.

    शेतकऱ्यांच्या सोयाबीनला 8 हजार रुपये आणि कापसाला 12 हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले असून, त्यांच्या या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. या तीन दिवसांमध्ये त्यांनी अन्नाचा एक कणही घेतला नसल्याने त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. आणि अजूनही राज्यकर्त्यांनी त्यांची कुठलीच दखल घेतली नसल्याने त्यांचे अन्नत्याग आंदोलन अजूनही सुरूच आहे. त्यामुळे जोपर्यंत सरकार कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव देत नाही तोपर्यंत जीव गेला तरी बेहत्तर मात्र अन्नाचा एक कणही घेणार नाही अशी ठाम भूमिका रविकांत तुपकर यांनी घेतले आहे.

    शेतकऱ्यांच्या सोयाबीनला 8 हजार रुपये आणि कापसाला 12 हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून 31 ऑक्टोबर रोजी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये विदर्भातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, आणि या वेळी सरकारने शेतकऱ्यांच्या सोयाबीन व कापसाला भाव द्यावा अशी मागणी केली होती. या मागण्या मंजूर न झाल्यास नागपूर येथील संविधान चौकांमध्ये अन्नत्याग आंदोलन करणार असल्याची घोषणा तुपकर यांनी केली होती. त्या अनुषंगाने रविकांत तुपकर यांनी 17 नोव्हेंबर पासून नागपूर येथील संविधान चौकात आपल्या अन्नत्याग आंदोलनास सुरुवात केली, मात्र कोविड नियमांचे कारण समोर करून नागपूर पोलिसांनी त्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना बुलडाणा येथील आपल्या निवासस्थानी पोहोचून दिले. मात्र, रविकांत तुपकर यांनी आपला निर्धार कायम ठेवत शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळावा यासाठी जागा आणि ठिकाण जरी बदललं असलं तरी मात्र त्यांनी आपल्या निवासस्थानी हे अन्नत्याग आंदोलन सुरू ठेवले आहे. गेल्या तीन दिवसापासून या आंदोलनाची कुठलीच दखल राज्यकर्त्यांनी घेतलेली नाही.