शासनाने नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत करावी; संजय भगत यांचीे मागणी

जाखणगाव ता. खटाव जि. सातारा येथे व परिसरात रात्री बारा ते दोनच्या सुमारास ढगफुटी सदृश्य अवकाळी पावसाने हजेरी लावली. यावेळी परिसरातील मेंढपाळ व शेळी पालन करणाऱ्या लोकांच्या अनेक शेळ्या मेंढ्यांचा मृत्यू झाला. अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

    वडूज : जाखणगाव ता. खटाव जि. सातारा येथे व परिसरात रात्री बारा ते दोनच्या सुमारास ढगफुटी सदृश्य अवकाळी पावसाने हजेरी लावली. यावेळी परिसरातील मेंढपाळ व शेळी पालन करणाऱ्या लोकांच्या अनेक शेळ्या मेंढ्यांचा मृत्यू झाला. अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

    तसेच पुसेगाव औंध रोडवर आमलेवाडी पूल येथे राजपद कॉन्ट्रॅक्टरने रस्त्याच्या कामासाठी घातलेला भराव पावसाची शक्यता लक्षात घेऊन तो हटवण्याची विनंती ग्रामस्थांनी वारंवार करूनही तो हटवला नाही. यामुळे आमलेवाडी परिसरातील व जाखणगाव परिसरातील तसेच गादेवाडी परिसरात सुमारे एक किलो मीटर पाण्याचा फुगवटा वाढल्यामुळे पंधरा ते वीस विहिरी पाण्याखाली गेल्या.

    इलेक्ट्रिक मोटर्स इलेक्ट्रिक साहित्य पाण्याखाली गेले व विहिरींची पडझड झाल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत संजय भगत यांनी दूरध्वनीवरून महसूल विभागाला माहिती दिल्यानंतर महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने पाहणी केली व पंचनामे करण्यास सुरुवात केली. मात्र, पंचनामे पूर्ण न झाल्यामुळे अद्याप नुकसानीचा आकडा कळालेला नाही. इथं शेळ्या मेंढ्यांची जीवितहानी व शेतकऱ्यांची वित्तहानी फार मोठ्या प्रमाणात झाली आहे.

    शासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना व मेंढपाळांना तातडीची मदत द्यावी. तसेच कृत्रिम संकट निर्माण केल्याप्रकरणी राजपथ कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर कायदेशीर कारवाई करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने केल्याची माहिती संजय भगत यांनी दिली