१९६६ मध्ये तामिळनाडूच्या मंदिरातून गायब झालेली कृष्णाची मूर्ती सापडली अमेरिकेत!

मंदिराजवळून चोरी झालेल्या मूर्तींचे फोटो नव्हते. अशा परिस्थितीत पोलिसांनी पुद्दुचेरीच्या फ्रेंच इन्स्टिट्यूटच्या फोटो आर्काइव्हमधून मंदिरातील मूर्तींची छायाचित्रे काढली.

    तामिळनाडू : 1966 मध्ये तामिळनाडूतील एका मंदिरातून चोरीला गेलेली भगवान कृष्णाची मूर्ती अमेरिकेतील एका संग्रहालयात सापडली आहे. श्रीकृष्णाची ही नृत्य करणारी ही प्राचीन मूर्ती चोळ काळातील आहे. या बद्दल अधिक तपास केला असता ही मुर्ती 1966 मध्ये मंदिरातून चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे.

    राज्याच्या मूर्ती विभाग सीआयडीने केलेल्या तपासादरम्यान, रामेश्वरम येथील श्री एकांत रामास्वामी मंदिरातून 6 मूर्ती चोरीला गेल्याचे आढळून आले. यापैकी एक भगवान श्रीकृष्णाची मूर्ती अमेरिकेतील इंडियानापोलिस म्युझियम ऑफ आर्टमध्ये सापडली आहे. आता ही मूर्ती भारतात परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मंदिराचे कार्यकारी अधिकारी जी नारायणी यांनी 23 नोव्हेंबर रोजी तक्रार दिली होती की 1966 मध्ये मंदिरातून तीनपेक्षा जास्त प्राचीन मूर्ती चोरीला गेल्या होत्या. ज्याचा तपास करताना सीआयडीला हे यश मिळालय. 

    मंदिराजवळून चोरी झालेल्या मूर्तींचे फोटो नव्हते. अशा परिस्थितीत पोलिसांनी पुद्दुचेरीच्या फ्रेंच इन्स्टिट्यूटच्या फोटो आर्काइव्हमधून मंदिरातील मूर्तींची छायाचित्रे काढली. फोटो पाहून लक्षात आले की 1958 मध्ये मंदिरात 12 धातूच्या मूर्ती होत्या. त्यापैकी 6 मूर्ती चोरीला गेल्या. तपासादरम्यान, पोलिसांनी जगभरातील संग्रहालयांच्या वेबसाइट्सचा शोध घेतला. यादरम्यान, इंडियानापोलिस म्युझियम ऑफ आर्टच्या वेबसाइटवर भगवान कृष्णाच्या नृत्याच्या मूर्तीसारखा एक फोटो सापडला. तो चोरीला गेलेल्या मुर्तीचा फोटो होता आणि ही मुर्ती संग्रहालयाने विकत घेतल्याची बाब समोर आली. त्यांनतर आता उर्वरित पाच मूर्ती शोधण्याचा सीआयडी प्रयत्न करत आहे.