बेस्ट प्रवाशांसाठी आधुनिक सेवेचा प्रारंभ; चलो मोबाइल ॲप, बेस्ट स्मार्ट कार्ड सेवेत

बेस्ट थांब्यावर उभ्या असलेल्या प्रवाशांना बस किती वेळात येईल, बस नेमकी कुठे आहे आदी माहिती ॲपमध्ये दिसेल. त्याचप्रमाणे बसमध्ये किती गर्दी आहे, बसण्यासाठी किती जागा शिल्लक आहेत आदी माहिती समजणार आहे.

  मुंबई (Mumbai) : बेस्ट उपक्रमाने मुंबईकरांना आधुनिक सुविधा असलेले चलो मोबाइल ॲप, बेस्ट स्मार्ट कार्ड सेवेत आणले आहे. चलो मोबाइल ॲपमुळे प्रवाशांना नेमकी बस किती वाजता येणार आहे, हे लगेच समजणार आहे. त्यामुळे बेस्टच्या प्रवाशांना यापुढे बससाठी फार वेळ तिष्ठत बसण्याची वेळ येणार नाही. या सेवेचे उदघाटन आज पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे केले.

  बेस्टमध्ये विजेवर धावणाऱ्या बस दाखल होत आहेत. २०२३ पर्यंत बेस्टच्या ताफ्यातील ५० टक्के बस विजेवरील असतील. तसेच, बेस्टमध्ये २०२७ पर्यंत सर्व बस विजेवर धावणाऱ्या असतील, असे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी मोबाइल ॲप, बेस्ट स्मार्ट कार्ड लोकार्पण सोहळ्यात बोलताना सांगितले. मुंबईत काही कार्यालये २४ तास सुरू असल्याने बस सेवा २४ तास देण्याचा विचार करण्याची सूचनाही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली.

  बेस्ट उपक्रमाने प्रवाशांसाठी सेवेत आणलेल्या ‘चलो मोबाइल ॲप’ च्या साहाय्याने बेस्ट प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी होणार आहे. तसेच बस थांब्यावर बससाठी थांबण्याचा वेळही वाचणार आहे. प्रवासासाठी तिकीट काढताना सुट्ट्या पैशांवरुन होणारे वाद टाळण्यासाठी स्मार्ट कार्ड सेवाही अंतर्भूत केली आहे. त्यावर तिकीटासह पास काढण्याची व्यवस्था पुरविली जाणार आहे.

  बेस्टच्या प्रवाशांना आतापर्यंत पाससाठी बेस्टच्या बस आगार, स्थानकाकडे फेऱ्या माराव्या लागतात. बेस्टमध्ये दैनंदिन प्रवासातही कंडक्टरकडून तिकिट घ्यावे लागते. सध्या बेस्टच्या दैनंदिन प्रवाशांची संख्या २५ ते २६ लाख एवढी आहे. मात्र, त्यांना ऑनलाइन वा ॲपवरुन तिकीट वा पास घेण्याची सुविधा नव्हती. त्याचा परिणाम म्हणून गर्दीच्या वेळी बसमध्ये प्रवाशांना तिकीट देण्यासाठी कंडक्टरना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यात, अनेकदा सुट्ट्या पैशांवरुनही कंडक्टर आणि प्रवाशांमध्ये वाद होतात. या सर्वांवर उपाय म्हणून बेस्टने नवीन मोबाइल तिकीट ॲप सेवा सुरू केली आहे. त्यात तिकीट, पास मिळविण्यासाठी प्रवाशांना मोबाइल ॲप डाऊनलोड करावे लागेल. यामुळे घरबसल्याही तिकीट काढता येईल. या ॲपवर एका प्रवासाचे तिकीट वा मासिक पास घेता येऊ शकणार आहे. प्रत्यक्ष प्रवास करताना प्रवाशांना तिकीट, पास दाखविण्यासाठी मोबाइल स्कॅन करुन प्रवास करण्यास अनुमती देण्यात आली आहे.

  बसचे नेमके ठिकाण समजणार
  बेस्ट थांब्यावर उभ्या असलेल्या प्रवाशांना बस किती वेळात येईल, बस नेमकी कुठे आहे आदी माहिती ॲपमध्ये दिसेल. त्याचप्रमाणे बसमध्ये किती गर्दी आहे, बसण्यासाठी किती जागा शिल्लक आहेत आदी माहिती समजणार आहे.

  प्रवाशांसाठी ७२ नवीन प्लॅन
  प्रवाशांना त्यांच्या नियमित प्रवासी भाड्यासह, प्रवासाच्या ठिकाणाच्या दृष्टीने ठराविक अंतराच्या अनुषंगाने बसपासची निवड करता येऊ शकेल. त्यात, एका दिवसांपासून ते ८४ दिवसांपर्यंत आणि दोन फेऱ्यांपासून १५० फेऱ्यांचा पर्याय असणार आहे.

  स्मार्ट कार्डचीही सुविधा
  जानेवारी २०२२ पासून बेस्टने अंतर्भूत केलेल्या स्मार्ट कार्डची सेवा प्रत्यक्ष उपलब्ध होणार आहे. त्या कार्डाच्या आधारे पास, तिकिटही काढता येणार आहे. या कार्डमध्ये दहा रुपये पासून ते तीन हजार रुपयांपर्यंत कितीही रक्कम रिचार्ज करता येणार असल्याचे बेस्टने स्पष्ट केले आहे.