शिवजयंतीसाठी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्याचं दाखवलं आमिष; हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

हिंगोली येथील सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत एक भलताच प्रकार घडला आहे. शिवजयंतीनिमित्त हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्याचं आमिष दाखवून काही भामट्यांनी तब्बल अडीच लाखांना गंडा घातला आहे. 

    हिंगोली : छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे. देशभरात मोठ्या उत्साहाने ही जयंती साजरी केली जाते. त्यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात. पण हिंगोली येथील सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत एक भलताच प्रकार घडला आहे. शिवजयंतीनिमित्त हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्याचं आमिष दाखवून काही भामट्यांनी तब्बल अडीच लाखांना गंडा घातला आहे.

    दरम्यान या प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. अजितकुमार दिलीप पाटील (रा. सांगली) आणि वाल्मिकी बालाजीराव केंद्रे (रा. नांदेड) असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नाव आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, समितीच्या सदस्यांनी फेसबुकच्या माध्यामातून आरोपी अजित पाटील याच्याशी संपर्क साधला होता. आरोपी अजित पाटील यानं शिवजयंतीनिमित्त हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यासाठी 2 लाख 40 हजार रुपये लागतील असं सांगितलं होत. सौदा पक्का ठरल्यानंतर आरोपीनं अन्य एका व्यक्तीला पैसे घेण्यासाठी पाठवलं. पदाधिकाऱ्यांनी देखील मोठ्या विश्वासाने सर्व रक्कम आरोपीकडे सुपूर्द केली. शासकीय परवानगीसाठी आरोपीनं काही कागदपत्रेही पाठवली. परवानगी मिळाल्यानंतर 17 फेब्रुवारी रोजी आरोपी अजित पाटील याने फिर्यादींना फोन केला आणि पुण्यातील हेलिकॉप्टर रद्द झाल्याची माहिती दिली.

    तसेच सध्या बंगळुरू येथे अन्य एक हेलिकॉप्टर असून त्यासाठी बारा लाख रुपये खर्च येईल असं सांगितलं. पण फिर्यादींना संशय आल्यानंतर त्यांनी पुण्यातील हेलिकॉप्टरच्या मालकाशी संपर्क साधला. यावेळी अशी कोणतीही बुकींग करण्यात आली नसल्याची माहिती मालकाने दिली.

    दरम्यान यानंतर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात धाव घेत दोघांविरोधात फिर्याद दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत अजितकुमार दिलीप पाटील (रा. सांगली) आणि वाल्मिकी बालाजीराव केंद्रे (रा. नांदेड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हिंगोली शहर पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.