सांगलीत चक्क गव्याने बंद पाडली बाजार समिती

सांगलीच्या आसपास शेतात फिरणारा गवा चक्क सांगली शहरात आला आहे, मध्यरात्री तो सांगलीच्या मार्केट यार्ड परिसरात दाखल झाल्याने, सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

    प्रविण शिंदे (प्रतिनिधी)

    सांगली : गेल्या काही दिवसांपासून सांगलीच्या आसपास शेतात फिरणारा गवा चक्क सांगली शहरात आला आहे, मध्यरात्री तो सांगलीच्या मार्केट यार्ड परिसरात दाखल झाल्याने, सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

    सांगलीवाडी परिसरात गेल्या दोन दिवसंपासून गव्याचे दर्शन होत होते, मात्र मोठ्या प्रमाणावर ऊस शेती असल्याने गवा किंवा लोकांना देखील धोका नव्हता, सोमवारी मध्यरात्री हा गवा सांगली शहरात प्रवेश करून शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वेअर हाऊस परिसरात गवा आला, सकाळी नागरिकांच्या निदर्शनास गवा आल्यानंतर प्रशासनाकडून मंगळवारी बाजार समितीचे व्यवहार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

    दरम्यान वन विभाग आणि प्रशासनाकडून बाजार समितीचे सर्व गेट बंद केले आहेत, तर ज्या ठिकाणी गवा आहे, तिथे देखील बॅरिकेट लावले आहेत, हा गवा जेरबंद करून त्याच्या मुख्य अधिवासात सोडण्याचे प्रयत्न वनविभाग करीत आहे. तर सांगली तहसीलदार यांनी मार्केट यार्ड परिसरात कलम १४४ लागू करून जमावबंदी केली आहे.