मी वापरलेल्या शब्दाचा अर्थ…; गुन्हा दाखल झाल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नवी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. मी ज्या शब्दाचा वापर केला त्याचा अर्थ मुर्ख आणि बुद्धू असा आहे, असं राऊत म्हणाले.

    नवी दिल्ली : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नवी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. मी ज्या शब्दाचा वापर केला त्याचा अर्थ मुर्ख आणि बुद्धू असा आहे, असं राऊत म्हणाले. सरकार आणि मान्यताप्राप्त शब्दकोषांमध्ये त्या शब्दाचा अर्थ आहे. मोठ्या साहित्यिकांनी त्याचा अर्थ सांगितला आहे. माझ्या विरोधात दिल्लीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालय दिल्ली पोलिसांचं नेतृत्त्व करते. हा गुन्हा बदल्याच्या  आणि राजकीय बदल्याच्या भावनेतून दाखल करण्यात आला आहे, असं संजय राऊत म्हणाले.

    दरम्यान सीबीआय , ईडी, इनकम टॅक्स माझ्यापर्यंत पोहोचू शकलं नाही. मात्र, या मार्गानं माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असं संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्रात तुम्ही काही करु शकत नाही. यंत्रणा माझ्या विरोधात बोलू शकत नाहीत. हे अशा प्रकारचे हातखंडे वापरून आमच्या विरोधात एफआयर दाखल केली जाते. मी त्यांना सांगू इच्छितो की  ही शिवसेना आहे त्यांनी लक्षात ठेवावं, असं संजय राऊत म्हणाले. सध्या संसदेचं सत्र सुरु आहे. माझ्यावर एफआयर दाखल करुन दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय, असही राऊत म्हणाले.

    विरोधकांची एकी करणं देशद्रोह आहे का?

    कोणी कुठली स्वप्न पाहू नयेत. 2014 ला नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील असं कोणी म्हटलं नव्हतं. देशात विरोधकांची एकता होण्याची गरज आहे. मी राहुल गांधी, ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा करत असतो. सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचं काम शरद पवार करु शकतात. विरोधकांना एकत्र येण्यापासून रोखण्यासाठी गुन्हा दाखल केला असावा. मी देशाच्या हितासाठी बोलत राहणार असं संजय राऊत म्हणाले. तसेच काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील युती संदर्भात विचारलं असता दोन्ही राजकीय पक्षात युती आघाडीसंदर्भात चर्चा सुरु असतात, मात्र सध्या दोन्ही पक्षात यासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही, असं संजय राऊत म्हणाले.