नायलॉन मांजामुळे गळा चिरला, नंतर दोन बोट कापली; सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

  नागपूर (Nagpur) : नायलॉन मांजा धोकादायक ठरत आहे. म्हाडगीनगरातील डॉ. राजेश क्षीरसागर यांचा गळा नायलॉन मांजानं आधी गळा चिरला. त्यानंतर हाताची दोन बोटं कापली. प्रसंगावधान पाहून गाडी थांबविल्यानं त्यांचा जीव वाचला. तर, दुसरीकडं गुन्हे शाखेने सहा लाख रुपये किमतीच्या नायलॉन मांजा जप्त केला.

  प्रशासनाची कारवाई तोकडी
  नागपूरच्या म्हाळगीनगर भागात राहणारे डॉ. राजेश क्षीरसागर हे रविवारी आपल्या मित्रासोबत मानकापूर ओहरब्रिज वरून दुचाकीने येत होते. दरम्यान, नायलॉन मांजाने त्यांचा गळा कापला. घटना इतकी भीषण होती की त्या नायलॉन मांजाने आधी राजेश क्षीरसागर यांचे जॅकेट कापले. तो गळ्यापर्यंत पोहचला. त्यांच्या लक्षात येताच त्यांनी स्वतःच्या बचावासाठी हात पुढे केला. त्या नायलॉन मांजाने हाताचे दोन बोटंदेखील कापली. त्याच दरम्यान त्यांनी आपली मोटारसायकल थांबवली. त्यामुळं त्यांचे प्राण वाचले. महापालिका आणि पोलीस प्रशासनाने नायलॉन मांजावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. मनपा आणि पोलीस प्रशासन कारवाई करत आहे. पण, ती तोकडी आहे, असं जखमी राजेश क्षीरसागर यांनी सांगितलं.

  नायलॉन मांजासह 6 लाखांची माल जप्त
  घातक असा नायलॉन मांजा विक्रीसाठी अवैधरित्या नागपुरात येत आहे. बंदी असलेल्या नायलॉन मांजा विरोधात पोलिसांनी मोठी मोहीम उघडली. गुन्हे शाखा पोलिसांनी मोठी कारवाई करत 6 लाख रुपये किमती चा मुद्देमाल जप्त केला. गुन्हे शाखा पोलिसांनी जोरदार कारवाई केली. यात मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजासह 6 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. नागपूरच्या पोलीस आयुक्तांनीसुद्धा त्या संदर्भात आदेश देत शहरात अवैध मार्गाने येणार नायलॉन मांजा जप्त करण्याचे आदेश दिले. त्यावरून पोलिसांनी सुद्धा जोरदार कंबर कसली असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप रायनावार यांनी दिली.

  सोमवारी 85 प्लास्टिक पतंग जप्त
  नागपूर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी प्लस्टिक पतंग आणि नॉयलॉन मांजा संदर्भात दोन झोनमध्ये कारवाई केली. लक्ष्मीनगर आणि सतरंजीपुरा झोनमधील 41 पतंग दुकानांची तपासणी करुन 85 प्लास्टिक पतंग आणि 3 नॉयलॉन मांजा जप्त करण्यात आले. तसेच 7 हजार रुपयांचा दंड ही लावण्यात आला. उपद्रव शोध पथकाद्वारे 2 प्रतिष्ठानांवर कारवाई करुन 15 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. पथकाने 25 प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली.