एकाच दिवसात ऑमीक्रोनचा विषाणू उतरला; शेअर बाजारात तेजी

निर्देशांकातील 30 पैकी 7 शेअर्समध्ये घसरण झाली. यात बजाज फायनान्स, क्सीस बँक आणि पॉवरग्रीडचा प्रामुख्याने समावेश आहे. यासोबतच एचसीएल टेक, विप्रो, टाटा स्टील, टेक महिंद्रा, टायटन, सनफार्मा आणि अल्ट्राटेकमध्ये तेजी दिसून आली.

    मुंबई, कोरोना विषाणुचा नवा व्हेरिएंट ऑमीक्रोनचा झपाट्याने प्रसार होताच आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात नकारात्मकता दिसून आली व दिवसभरात गुंतवणूकदारांचे 8.22 लाख कोटींचे नुकसान झाले होते.

    तथापि दुसऱ्याच दिवशी शेअर बाजारात तेजी आल्याने व गुंतवणूकदारांच्या संपत्तीतही वाढ झाल्याने ऑमीक्रोन विषाणूचा ‘ज्वर’ एकाच दिवसाच उतरला की काय असा प्रश्नही सामान्यांना पडला. मंगळवारी निर्देशांकात 497 अंकांची तर निफ्टीतही 156.65 अंकांची वाढ झाली व गुंतवणूकदारांचा तब्बल 3.26 लाख कोटींचा फायदा झाला. यासोबतच सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलातही वाढ झाली असून ते 255.83 लाख कोटींवर पोहोचले.

    मध्यंतरात 1070 अंकांची उसळी
    व्यवसायाच्या प्रारंभी सकाळी 480 अंकांच्या तेजीसह निर्देशांक 56,320 वर पोहोचला होता. दिवसभरात त्याने 56,900 अंकांपर्यंत मजलही मारली व त्यानंतर 56,047 पर्यंत घसरणही झाली. याचाच अर्थ दिवसभरात 1070 अंकांची तेजी झाली. तथापि व्यवसाय अखेरीस ही तेजी बाजाराने गमावली आणि तो केवळ 497 अंकांपर्यंत मजल मारू शकला. दिवसअखेर सेन्सेक्स 56,319 तर निफ्टी 16,770.85 अंकांवर स्थिरावला.

    7 शेअर्समध्ये घसरण
    निर्देशांकातील 30 पैकी 7 शेअर्समध्ये घसरण झाली. यात बजाज फायनान्स, क्सीस बँक आणि पॉवरग्रीडचा प्रामुख्याने समावेश आहे. यासोबतच एचसीएल टेक, विप्रो, टाटा स्टील, टेक महिंद्रा, टायटन, सनफार्मा आणि अल्ट्राटेकमध्ये तेजी दिसून आली.