महाविकास आघाडीवर निकालाचा कोणताही परिणाम होणार नाही; आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया

पाच राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर उत्तर प्रदेश आणि गोव्यात शिवसेनेला मोठा झटका बसला आहे. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनीही आपली भूमिका मांडली.

    मुंबई : उत्तर प्रदेश आणि गोवा विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेने मोठी भीम गर्जना करत उडी घेतली होती. मात्र दोन्ही ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. पण ‘आमच्या सरकारचे हे पहिलेच वर्ष आहे. त्यामुळं ही आमची सुरूवात आहे. महाराष्ट्रात परिणाम होणार नाही’ अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.

    आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले? 

    पाच राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर उत्तर प्रदेश आणि गोव्यात शिवसेनेला मोठा झटका बसला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपच्या विजयाचे कौतुक करत प्रतिक्रिया दिली. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनीही आपली भूमिका मांडली.

    ‘जे जिंकलेत त्यांचे अभिनंदन. त्यांनी दिलेले वचन ते पूर्ण करतील अशी आशा आहे. जे लढलेत त्यांचेही अभिनंदन, निवडणुकीमध्ये हार जीत होतच असते.  नैराशाचे वातावरण नाही. सुरूवात महत्वाची आहे. आम्ही येथून पुढे लढत राहू सर्वत्र एकत्र आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

    तसेच पुढे म्हणाले की, ‘आम आदमी पक्षाने चांगले काम केलंय. आपच्या मागील वेळेस 30 जागा होत्या. दिल्लीत आपचे तिसऱ्यांदा सरकार आहे. राज्यात आमचे पहिले सरकार आहे. त्यामुळे ही आमची सुरूवात आहे. महाराष्ट्रात परिणाम होणार नाही. महाराष्ट्र मॉडेल समजायला जरा वेळ लागेल’ असंही ठाकरे म्हणाले.