पालखी महामार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी : जिल्हाधिकारी

पालखी मार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रिया अधिक गतीने होणे आवश्यक आहे. यासाठी उपविभागीय अधिकारी व संबंधित सर्व स्थानिक अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडील कामे वेळेत मार्गी लावावीत. महसूल विभागाच्या वतीने उपविभागीय अधिकारी हे नोडल अधिकारी असून इतर सर्व स्थानिक शासकीय यंत्रणांनी त्यांच्याशी समन्वय ठेवून अधिक गतीने कामे पूर्ण करावीत.

    सोलापूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : पालखी महामार्गाची भूसंपादन प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी पंढरपूर व माळशिरस उप विभागातील सर्व स्थानिक शासकीय यंत्रणांनी परस्परात योग्य तो समन्वय ठेवावा. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषी विभाग, भूमी अभिलेख व राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या संपर्कात राहून दिलेली जबाबदारी अत्यंत दक्षपणे पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (Milind Shambharkar) यांनी दिले.

    जिल्हाधिकारी यांच्या दालनात आयोजित पालखी मार्ग व इतर महामार्ग भूसंपादन तसेच रेल्वे भूसंपादन च्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी शंभरकर बोलत होते. यावेळी विशेष भू संपादन अधिकारी अरुणा गायकवाड, रेखा सोळंके, राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता श्री. कदम, कृषी विभागाचे तंत्र अधिकारी अंकुश बरडे, रेल्वेचे श्री. गायकवाड व अन्य अधिकारी उपस्थित होते.

    जिल्हाधिकारी शंभरकर पुढे म्हणाले की, पालखी मार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रिया अधिक गतीने होणे आवश्यक आहे. यासाठी उपविभागीय अधिकारी व संबंधित सर्व स्थानिक अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडील कामे वेळेत मार्गी लावावीत. महसूल विभागाच्या वतीने उपविभागीय अधिकारी हे नोडल अधिकारी असून इतर सर्व स्थानिक शासकीय यंत्रणांनी त्यांच्याशी समन्वय ठेवून अधिक गतीने कामे पूर्ण करावीत, असेही त्यांनी सूचित केले.

    पंढरपूर उपविभागतील नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशनची सिंगल सर्किट लाईन 50 किलोमीटर व डबल सर्किट लाईन 50 किलोमीटर अशी एकूण शंभर किलोमीटरची लाईन जात असून, या ठिकाणच्या जमिनीचे, कृषी पिकांचे व वृक्षांचे मूल्यांकन पुढील आठवड्यात पूर्ण करावे. यासाठी सर्व संबंधित स्थानिक यंत्रणांनी परस्परात समन्वय ठेवावा व नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशनने एक अधिकारी येथे नियुक्त करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिल्या.

    यावेळी जिल्हाधिकारी शंभरकर यांनी पालखी मार्ग व इतर भूसंपादन बाबत आढावा घेऊन सर्व संबंधित यंत्रणांना मार्गदर्शक सूचना दिल्या. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रादेशिक अधिकारी केशव घोडके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी गजानन गुरव, माळशिरसचे उपविभागीय अधिकारी विजय देशमुख यांच्यासह अन्य संबंधित विभागाचे अधिकारी व्ही. सी. द्वारे बैठकीस उपस्थित होते.