
बुधवारी पहाटे 5.30 पासून आकाशात अचानक ढग येवून रिपरिप पावसाला प्रारंभ झाला. सकाळी 7 वाजता पावसाने आपली गती अधिक वाढवून ढगांच्या गडगडाटासह पावसाळयातील आठवण जागे करीत विजांचा कडकडाट दोन वेळा झाल्याने त्यामधील एक वीज खुपसंगी परिसरात एका पशुपालकाच्या शेतात पडली.
मंगळवेढा : मंगळवेढा तालुक्यात बुधवारी सकाळी अचानक जवळपास तासभर पावसाच्या मोठया सरी कोसळल्या. यामुळे रस्ते जलमय झाल्याचे चित्र असून हा पाऊस रब्बी ज्वारी पिकास जीवदान ठरणार असल्याची चर्चा शेतकरी वर्गातून होत आहे. दरम्यान खुपसंगी येथे वीज पडून एका पशुपालकाची खिलार गाय मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली आहे.

बुधवारी पहाटे 5.30 पासून आकाशात अचानक ढग येवून रिपरिप पावसाला प्रारंभ झाला. सकाळी 7 वाजता पावसाने आपली गती अधिक वाढवून ढगांच्या गडगडाटासह पावसाळयातील आठवण जागे करीत विजांचा कडकडाट दोन वेळा झाल्याने त्यामधील एक वीज खुपसंगी परिसरात एका पशुपालकाच्या शेतात पडली. या मध्ये धर्मा मसा भोसले यांची खिलार गाय मृत्यूमुखी पडून जवळपास 25 ते 30 हजाराचे नुकसान झाल्याचा अंदाज असून संबंधीत सजेचे तलाठी जिरापुरे यांनी या घटनेचा पंचनामा केला आहे. यंदा पावसाळयात अत्यल्प पाऊस पडल्यामुळे रब्बी ज्वारीची पिके पावसाअभावी त्यांची वाढ खुंटत चालली होती. दरम्यान आज पडलेल्या पावसामुळे काहीशा प्रमाणात त्यांचा दिलासा मिळाल्याचे शेतकर्यांचे मत आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाळी स्थिती निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. गेली दोन दिवस ढगाळ वातावरणाची परिस्थिती असल्याने पाऊस येणार याचे भाकीत सर्वत्र व्यक्त होत होते. बुधवारी दिवसभर सुर्यनारायणाचे दर्शन मंगळवेढेकरांना घडू शकले नाही. रिपरिप पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. सध्या थंडीचे दिवस असतानाही थंडी न पडता दिवसभर अद्यापही ऑक्टोबर हिटच जाणवत होती. बुधवारच्या थंड वातावरणामुळे नागरिकांची उकाडयातून सुटका झाली आहे. दरम्यान या पावसाची मंगळवेढयात 17.7 मि.मि.इतकी नोंद महसुल दप्तरी नोंदवली आहे. वीजांचा कडकडाट होताच मंगळवेढयातील वीज तब्बल पाच तास गायब झाल्याने सकाळी दैनंदिन व्यवहार पूर्ण करण्यात अनेक कुटुंबियांना अडचणीशी सामना करावा लागला. वीज गायब होणेबाबत शहरचे अभियंता कोळेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वीज तारावर झाडाच्या फांद्या तुटून पडल्याने वीज खंडीत झाल्याचे सांगण्यात आले.सकाळी 10 वाजता वीज आली मात्र पुन्हा ही सातत्याने गायब होत असल्याने नागरिक या घटनेमुळे त्रस्त झाले होते.
फोटो ओळी- शहरातील रस्ते पडलेल्या पावसामुळे जलमय झाल्याचे तर दुसर्या छायाचित्रात वीज पडल्याने एका गायीचा मृत्यू झाल्याची दुर्घटना छायाचित्रात दिसत आहे.