मोबाईल टॉवरच्या ऑपरेटर रुममधून सुरू होती दारुविक्री; देशी दारूच्या ९ पेट्या, विदेशी दारूचे १९ पव्वे जप्त

पोंभुर्णा तालुक्यातील उमरी पोतद्दार पोलिस स्टेशन हद्दीतील सातारा कोमटी येथील मोबाईल टॉवरच्या ऑपरेटर रूममधून अवैध देशी दारूच्या ९ पेट्या, विदेशी दारूचे १९ पव्वे पोलिसांनी जप्त केले आहेत.

    चंद्रपूर (Chandrapur) : दारूबंदीच्या दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यात अवैध दारूचा पूर वाहत होता. गावागावात अवैध दारू विक्रेत्यांनी पाय पसरले होते. जिल्ह्यातील दारूबंदी उठवल्यानंतरही अवैध दारू विक्री थांबलेली नाही. जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यात येणाऱ्या सातारा कोमटी येथिल मोबाईल टॉवरच्या ऑपरेटर रुममधून चक्क दारूविक्री होत असल्याचा प्रकार पुढे आला आहे. या प्रकाराने गावकरीही आश्चर्यचकित झाले आहे.

    प्राप्त माहीतीनुसार, पोंभुर्णा तालुक्यातील उमरी पोतद्दार पोलिस स्टेशन हद्दीतील सातारा कोमटी येथील मोबाईल टॉवरच्या ऑपरेटर रूममधून अवैध देशी दारूच्या ९ पेट्या, विदेशी दारूचे १९ पव्वे पोलिसांनी जप्त केले आहेत. पोलिसांनी धाड टाकताच अवैध दारू विक्रेता फरार झाला असून विकास ठाकरे असे फरार दारू विक्रेत्याचे नाव आहे.

    सातारा कोमटी परिसरात विकास ठाकरे हा अवैध दारू विक्री करीत असल्याची खबर पोलीसांना आधीच मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी विषेश पथक तयार करत दारुच्या अड्ड्यावर धाड टाकली. आरोपीने दारूच्या पेट्या मोबाईल टॉवरच्या आपरेटर रूममधे लपवून ठेवल्या होत्या. याची माहीती पोलिस पाटील, महिलांना मिळताच त्यांनी पोलीसांना माहिती दिली. मोबाईल टॉवरच्या परिसराची झाडाझडती घेतली असता दारूच्या पेट्या आढळल्या. या प्रकरणी पोलीस पुढील कारवाई करीत आहेत.