एसटी कर्मचार्‍यांच्या संपाने अवैध वाहतूक फोफावली

महाराष्ट्रामध्ये नोव्हेंबर महिन्यात २६६३ अपघात झाले. या अपघातात ११८० प्रवाशांचा मृत्यू तर २७७४ प्रवासी जखमी झाले. हा आकडा जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येते. संपामुळे काळी पिवळी जीप, वडाप टेम्पो ट्रॅव्हलर, खासगी बस यांनी बेधडक खुली प्रवासी वाहतूक सुरू केली आहे.

  • दररोज ४० प्रवाशांचा अपघाती मृत्यू ; सर्वसामान्यही प्रवाशांचे प्रचंड हाल

रांजणी : मागील ५४ दिवसापासून सुरू असलेल्या एसटी संपामुळे राज्यात बेकायदेशीर खाजगी वाहतूक खुलेआम सुरू आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळल्याने एसटी प्रवाशांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागत आहे. एसटी कर्मचार्‍यांच्या संपाने व सरकारच्या निष्काळजीपणाने संपूर्ण हद्दी पार केल्याचे दिसून येते. कारण एसटी कर्मचाऱ्यांचा संप हाताळण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचे दिसून येते. या संपामुळे राज्यात निरंकुश बेकायदेशीर खाजगी वाहतूक सुरू आहे . यामुळे नोव्हेंबर महिन्यात अपघातांमध्ये वाढ झालेली असून दररोज ४० प्रवाशांना अपघातांमध्ये आपला प्राण गमवावा लागत आहे. यावरून असे दिसून येते की एसटी संपामुळे बेकायदेशीर खाजगी वाहतूकदारांना सरकारने खुलेआम सूट दिली की काय अशी शंका येते.

महाराष्ट्रामध्ये नोव्हेंबर महिन्यात २६६३ अपघात झाले. या अपघातात ११८० प्रवाशांचा मृत्यू तर २७७४ प्रवासी जखमी झाले. हा आकडा जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येते. संपामुळे काळी पिवळी जीप, वडाप टेम्पो ट्रॅव्हलर, खासगी बस यांनी बेधडक खुली प्रवासी वाहतूक सुरू केली आहे. प्रवाशांकडून खाजगी वाहन चालक अव्वाच्या सव्वा पैसे घेतात. यावर सरकारचे काहीच नियंत्रण नसल्याने अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. कारण या वाहनांमध्ये नियमबाह्य पद्धतीने क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी कोंबले जातात. यामुळे रस्ता सुरक्षा नियम पायदळी तुडवून अपघात वाढताना दिसत आहे.

नोव्हेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त अपघात

नोव्हेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक अपघात आणि मृत्यू झाल्याचे दिसून येत आहे. खाजगी वाहन चालक संपाचा पूर्णपणे फायदा घेत कालबाह्य पूर्ण झालेल्या गाड्यांतून प्रवास, वेगाने वाहने चालविणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविणे, गाडी चालवताना मोबाईलचा वापर करणे, पुरेशी विश्रांती न घेता वाहन चालवणे ही रस्ते अपघाताची मुख्य कारणे आहेत. ह्या वाढत्या अपघातांना एसटी कर्मचाऱ्यांचा संपच कारणीभूत असल्याचे दिसून येते.

एसटी बससेवेवरच प्रवाशांचा विश्वास

महाविकास आघाडी सरकार एसटी कर्मचाऱ्यांचा संप पूर्णपणे हाताळण्यात अपयशी ठरल्याचे दिसून येते आणि त्यांचा संपूर्ण फायदा खासगी वाहतूक चालक घेता येईल. परंतु, खासगी वाहतूक सुरक्षित नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. एसटी बस सुरळीत सुरू राहिल्या असत्या तर कदाचित एवढे अपघात टाळता आले असते. राज्यातील संपूर्ण प्रवाशांचा एसटीवर एवढा दृढ विश्वास आहे. सर्वसामान्यांना एसटीचा प्रवास सुरक्षित सुलभ समाधानी व आनंदही वाटतो.

परिवहन मंत्री प्रवाशांबाबत निष्क्रिय

परिवहन मंत्री अनिल परब ठोस पावले उचलत नसल्याने ते राज्यातील प्रवाशांविषयी निष्क्रिय दिसतात. तसेच एसटी कर्मचाऱ्यांचा संप दिवसेंदिवस चिघळत आहे. या संपाबाबत शंका आहे की परिवहन मंत्री अनिल परब मंत्री आहेत की आघाडी सरकारचे परिवार मंत्री आहेत. ५४ दिवसात करोडो प्रवाशांचे हाल झाले आणि होत आहेत.

एसटीचा संप ताबडतोब संपुष्टात आणा

त्याचसोबत महाराष्ट्राचे करोडो रुपयांचे नुकसान सुद्धा झाले तरीही संपकरी कर्मचारी अडुनच आहे. महाराष्ट्रात तब्बल तीन नामांकित पक्षांचे सरकार (महाविकास आघाडी ) असून सुद्धा संपावर तोडगा निघत नाही, हे महाराष्ट्रातील प्रवाशांचे दूरभाग्यच म्हणावे लागेल. आता महाराष्ट्रातील जनतेला प्रश्न आहे की खासगी वाहतूकदारांसोबत सरकारचे साटेलोटे तर झाले नसेल. कारण अजून पर्यंत लालपरीची चाके रूळावर आलेली दिसत नाही. त्यामुळे सरकारने खाजगी वाहतुकीचे वाढते अपघात रोखण्यासाठी एसटीचा संप ताबडतोब संपुष्टात आणावा. राज्यात सुरक्षित व सुलभ प्रवास सरकारकडून मिळत नसल्याने प्रत्येक प्रवासी अत्यंत चिंतेत आहे. याकडे सरकारने जातीने लक्ष देण्याची गरज आहे.