ट्रकची दुचाकीला धडक; आई, मुलगी आणि दिराचा जागीच मृत्यू; दुचाकीचा भडका

जिल्ह्यातील आष्टी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आणि आष्टी वरून केवळ ६ किलोमीटर अंतरावर असलेल्या उमरी जवळ ट्रक आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात आई, ४ वर्षीय मुलगी आणि दिर या तिघांचा जागीच मृत्यू झाला.

    गडचिरोली (Gadchiroli) : जिल्ह्यातील आष्टी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आणि आष्टी वरून केवळ ६ किलोमीटर अंतरावर असलेल्या उमरी जवळ ट्रक आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात आई, ४ वर्षीय मुलगी आणि दिर या तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की चार वर्षीय मुलीचा मेंदूच बाहेर पडला एवढेच नव्हे तर ट्रकचा धडक लागताच दुचाकी जळून खाक झाली.

    ८ डिसेंबर बुधवारला दुपारी साडेतीन च्या सुमारास गडचिरोली वरून आष्टी कडे जाणाऱ्या AP 16 TY 6822 क्रमांकाचा ट्रक आष्टी कडून कोनसरी कडे जाणारी MH 33 Y 4295 क्रमांकाची दुचाकीला जबर धडक दिली यात दुचाकीवरील तिघे जण जागीच ठार झाले. मृतकात सूरज बालाजी कुसनाके वय ३५ रा. मुधोली ता चामोर्शी जि गडचिरोली, ललिता नितेश कुसनाके वय २५ वर्ष रा मुधोली रिठ ता.चामोर्शी जि गडचिरोली, रितिका नितेश कुसनाके वय ४ वर्ष रा मुधोली रिठ ता चामोर्शी जि गडचिरोली यांचा समावेश आहे. यामध्ये ललिता कुसनाके व रितिका ही आई आणि मुलगी असून सूरज हा ललिता कुसनाके यांचा दिर आहे. धडक लागताच तिघेजण एकीकडे फेकले गेले. अपघाताच्या ठिकाणाहून केवळ १३ किलोमीटर अंतरावर मुधोली गाव आहे. मात्र, गावाच्या जवळपास पोहोचूनही ते घरी पोहोचू शकले नाही.

    सूरज कुसनाके आपल्या वहिनी व पुतणीला गोंडपीपरी येथे दवाखान्यात उपचारासाठी नेले होते. उपचार घेऊन परतत असताना काळाने कुसनाके कुटूंबीयावर घाला घातला.हा अपघात इतका भीषण होता की ४ वर्षीय रितिकाचा मेंदू अक्षरशः बाहेर निघाला तर दुचाकी जळून खाक झाली. कुसनाके कुटूंबियावर घडलेल्या या दुःखद प्रसंगामुळे मुधोली रिठ वासीयांवर शोककळा पसरली आहे.अपघाताची माहिती मिळताच आष्टी पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतकांना शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे आणले. ट्रक चालक फरार झाला.