विविध बँकांमध्ये दावा न केलेली रक्कम हजारो कोटींच्या घरात; खासदार महाडिक यांनी विचारलेल्या प्रश्नावर केंद्रीय अर्थराज्यमंत्र्यांची माहिती

देशातील बँकांमध्ये दावा न केलेल्या ठेवींचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा या ठेवींमध्ये 28 टक्के वाढ झाली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, बँकांमधील दावा न केलेली रक्कम मार्च 2023 पर्यंत वाढून 42,270 कोटी रुपये झाली.

    मुंबई : देशातील बँकांमध्ये दावा न केलेल्या ठेवींचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा या ठेवींमध्ये 28 टक्के वाढ झाली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, बँकांमधील दावा न केलेली रक्कम मार्च 2023 पर्यंत वाढून 42,270 कोटी रुपये झाली. मार्च 2022 पर्यंत हा आकडा 32,934 कोटी रुपये होता. बँकांमध्ये जमा झालेल्या या पैशावर कोणीही दावा केलेला नाही.

    राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी अर्थमंत्र्यांना खासगी आणि सरकारी बँकांमधील दावा नसलेल्या ठेवींबाबत प्रश्न विचारला. तसेच ज्या लोकांचे पैसे बँकांमध्ये जमा आहेत त्यांची ओळख पटवण्यासाठी सरकार काय पावले उचलत आहे, हा प्रश्नही त्यांनी विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री भागवत कराड म्हणाले, 42,270 कोटी रुपयांच्या दावा न केलेल्या ठेवींपैकी 36185 कोटी रुपये सरकारी बँकांमध्ये आणि 6087 कोटी रुपये खासगी बँकांमध्ये जमा आहेत.

    आरबीआयने हक्क नसलेल्या ठेवी कमी करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. यामुळे योग्य व्यक्ती ओळखता येईल आणि त्यांचे पैसे परत करता येतील. 10 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ बँक खात्यात दावा न केलेल्या ठेवी राहिल्यानंतर बँका ही रक्कम आरबीआयच्या ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधीमध्ये जमा करतात, असेही त्यांनी सांगितले.