2017 मध्येच राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये युती होणार होती; सुनील तटकरे यांचा गौप्यस्फोट

राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत २०१७ मध्येच युती करण्याचा निर्णय घेतला होता. असा धक्कादायक दावा सुनील तटकरे यांनी केला आहे.

    अलिबाग – लोकसभा निवडणूकीमुळे राजकीय नेत्यांच्या सभांचा धडाका चालू आहे. यंदाच्या निवडणूकीमध्ये राज्याचे राजकारण रंगले आहे. यादरम्यान अजित पवार गटाने शरद पवार गटाबद्दल अनेक गौप्यस्फोट केले आहे. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नवीन गोष्टींचा खुलासा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत २०१७ मध्येच युती करण्याचा निर्णय घेतला होता. जागा वाटप, मंत्रीपद वाटप याबाबतही ठरले होते.

    2017 मध्येच राष्ट्रवादी काँग्रेस- भाजप युती

    अलिबाग येथे झालेल्या सभेमध्ये सुनील तटकरे यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. भाषणामध्ये बोलताना तटकरे म्हणाले, 2017 मध्येच राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत युती केली होती. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांच्या समवेत आमची बैठक झाली. मात्र तुम्ही आमच्यासोबत या पण आम्ही शिवसेनेला सोडणार नाही अशी अट त्यांनी ठेवली. त्यामुळे निर्णय होता होता राहिला. असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला. ते अलिबाग येथे प्रचारसभेत बोलत होते.

    वेळोवेळी व्यापक हितासाठी असे निर्णय घ्यावे लागतात

    यावरून भाजपची शिवसेनेच्या युतीबाबत असलेली कटीबद्धता दिसून येत. 2019 ला शिवसेना भाजप एकत्र लढले. नंतर मात्र शिवसेनेनी आमच्यासोबत सत्ता स्थापन केली. हा निर्णय न पटल्याने शिवसेनेच्या आमदारांनी वेगळा गट स्थापन करून महायुतीत प्रवेश केला. आम्ही देखील व्यापक राष्ट्रहित आणि विकासाच्या मुद्द्यावर महायुतीत सहभागी झालो. राजकारणात अपरिहार्यता असतात. त्यामुळे वेळोवेळी व्यापक हितासाठी असे निर्णय घ्यावे लागत असल्याचेही तटकरे म्हणाले.