लोखंडी सळई घेऊन जाणारा ट्रक लुटणाऱ्या चोरट्यांना अटक; सोनई पोलिसांची कारवाई

अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर (Ahmednagar-Aurangabad Highway) घोडेगाव शिवारात लोखंडी सळई (गज) घेऊन जाणारा ट्रक लूटप्रकरणी टोळीस मुद्देमालासह जेरबंद करण्यास सोनई पोलिसांना यश आले आहे.

  सोनई / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर (Ahmednagar-Aurangabad Highway) घोडेगाव शिवारात लोखंडी सळई (गज) घेऊन जाणारा ट्रक लूटप्रकरणी टोळीस मुद्देमालासह जेरबंद करण्यास सोनई पोलिसांना यश आले आहे.

  जालना येथून 21850 किलो वजनाच्या लोखंडी सळ्या (गज) घेऊन पुण्याकडे जात होता. या ट्रकला घोडेगाव शिवारात दोन दुचाकीस्वारांनी गाडी आडवी लावून चालकाला चाकूचा धाक दाखवून
  त्यास बळजबरी घेऊन जाऊन 5 लाख 61 हजार रुपयांचा मुद्देमाल आणि चालकाचा सात हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून पसार झाले होते.

  याप्रकरणी ट्रकचालक निसार गुलाम शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी व पथकाने पाथर्डी व पाथर्डी परिसरात शोध घेत सुजित राजेंद्र चौधरी (निपाणी वडगाव, ता. पाथर्डी), संकेत बद्रीनाथ बडे, (मूळ रा. जेऊर हैबती ता. नेवासा, हल्ली रा. आगसखांड, तालुका पाथर्डी), रोहन संजय चव्हाण (शिक्षक कॉलनी, पाथर्डी), दत्तात्रय गोरक्ष साळुंके (निवडूंगे, ता.पाथर्डी) यांना जेरबंद केले.

  चोरलेल्या स्टीलबाबत पोलिसांनी आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी चोरलेले स्टील
  शंकर आसाराम घोडके (रा. निवडूंगे) यास विकल्याची कबुली दिली. त्यानुसार, सोनई पोलिसांनी घोडके यास अटक करून त्याच्याकडून 6860 किलो वजनाचे 4 लाख 80 हजार 200 रुपयांचे स्टील हस्तगत केले.