…ही तर भाजपच्या आगामी निवडणुकीतील पराभवाची कबुलीच; काँग्रेसची टीका

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या पुणे दाैऱ्याने राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसने भाजपच्या विराेधात आंदाेलन केले. तर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शहा यांची भेट घेण्यासाठी प्रयत्न केले. तर काॅंग्रेसने हा दाैरा म्हणजे भाजपच्या आगामी निवडणुकीतील पराभवाची कबुली असल्याची टीका केली आहे.

  पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या पुणे दाैऱ्याने राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसने भाजपच्या विराेधात आंदाेलन केले. तर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शहा यांची भेट घेण्यासाठी प्रयत्न केले. तर काॅंग्रेसने हा दाैरा म्हणजे भाजपच्या आगामी निवडणुकीतील पराभवाची कबुली असल्याची टीका केली आहे.

  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची भाजपची सत्ता असलेल्या कर्नाटक राज्यात विटंबना करण्यात आली. महापालिकेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे भूमिपूजन आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी भाजपने शहरभर लावलेल्या फलकांवर या दाेन्ही महापुरुषांचे छायाचित्र न छापून भाजपने त्यांचा अवमान केल्याचा आराेप करीत राष्ट्रवादी काॅंग्रेसने रविवारी आंदाेलन केले. भाजपचा निषेध करण्यासाठी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने  झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्याजवळ झालेल्या आंदाेलनानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक केला गेला.

  कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेवर पक्षाकडून तीव्र टीका केली गेली. कर्नाटकातील घटनेबद्दल राज्यातील सर्व भाजप नेते मूग गिळून बसले आहेत. देवेंद्र फडणवीस यांची छत्रपती शिवाजी महाराजांवर खरी श्रद्धा असती तर क्षणाचाही विलंब न करता त्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा निषेध केला असता, परंतु त्यांनी तसे केले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानापेक्षा फडणवीसांना त्यांची पक्षनिष्ठा महत्वाची वाटली, अशी भावना यावेळी जगताप यांनी व्यक्त केली.

  राष्ट्रीय राजकारणातील भाजपचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते अमित शहा यांना महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात बोलवावे लागले. ही भाजपच्या महापालिकेच्या येत्या निवडणुकीतील पराभवाची कबुलीच आहे, अशी टीका माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली.

  शहरात मोठमोठे फलक लावले. त्यावर चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, अमित शहा यांचे मोठमोठे फोटो होते. पण, महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न पूजनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो त्या फलकांवर नव्हते. राजकारणासाठी महापुरुषांच्या नावाचा वापर करुन घ्यावयाचा. ”मुँह में राम, बगल में छुरी’ ही भाजपची नीती पुणेकरांना पहायला मिळाली, अशीही टीका जोशी यांनी केली.

  निराेप आज सकाळी दिले गेले : धुमाळ

  महानगरपालिकेच्या आवारात भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे भूमिपूजन समारंभ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते केला गेला. सत्ताधारी भाजपने  या कार्यक्रमाचे निमंत्रण पाठविले. पण पास रविवारी सकाळी अकरा वाजता घरी पाठविले. त्याचप्रमाणे कार्यक्रमासाठी काेराेनाची चाचणी अहवाल सादर करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.

  ऐनवेळी हा निराेप दिल्याचा आराेप विराेधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केला आहे. विरोधकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहूच नये अशा प्रकारची ऐनवेळेस नियोजन केले आहे. कोरोना टेस्ट करून घ्यायची बंधनकारक होते तर यासंबंधीची सूचना दोन-तीन दिवस अगोदर देणे आवश्यक होते. ही टेस्ट केल्यानंतर साधारण चोवीस तासांनी रिपोर्ट मिळतो याची जाणीव असताना सुध्दा सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाला का सूचना दिल्या नाहीत. हे जाणीवपूर्वक केले कृत्य असल्याचे नमूद करीत धुमाळ यांनी निषेध केला आहे.