कंगनाची हुजरेगिरी करणाऱ्यांना बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही; रूपाली पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल

रयत शिक्षण संस्था आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सामने बघायला मिळत आहे. आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिले आहे.

  पुणे : रयत शिक्षण संस्था आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सामने बघायला मिळत आहे. साताऱ्यात शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी माझी उंची शरद पवारांची उंचीपेक्षा दोन इंच लहान आहे असे म्हंटले होते. यावरून राष्ट्रवादी काँग्रसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी महेश शिंदेंनी आपला मेंदु तपासून पाहावा असे म्हंटले.

  दरम्यान आता या वादात भाजप नेत्यांनी देखील उडी मारली आहे. भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट केले आहे.

  ते म्हणाले आहेत की,’बाळासाहेबांनी उंची व्यवस्थित मोजली होती.’ तसेच या ट्विटसोबत त्यांनी सामना वृत्तपत्राच्या जुन्या अंकाचा फोटो टाकला आहे. यामध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या सभेचा फोटो असून ‘निश्चयाचा महामेरु कसले, पवार तर सोनियांचे पायधरू’,असे या बातमीचे शीर्षक आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील टीका केली आहे.

  आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिले आहे.

  रुपाली पाटील ठोंबरे नेमकं काय म्हणाल्या? 

  ज्या बाळासाहेबांचे बोट धरून भाजपा महाराष्ट्रात मोठी झाली त्याच बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसून शिवसेना संपवायला निघालेल्याची उंची महाराष्ट्राने पाहिली तसेच कंगनाची हुजरेगिरी करणाऱ्यांना बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही, असा टोला देखील यावेळी लगावला आहे.