माणेराजुरीच्या डोंगरावर सापडले तीन मृतदेह; आत्महत्या की घातपात उलटसुलट चर्चा

तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथे शेकोबा डोंगरावर एका युवकासह दोन तरुणींचा मृतदेह सापडला असल्याची खळबळजनक घटना गुरुवारी सकाळी निदर्शनास आली. प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याची परिसरात चर्चा आहे. मात्र, एक तरुण आणि दोन तरुणींनी एकाचवेळी आत्महत्या केल्यामुळे उलटसुलट चर्चा असून, नेमके कारण अस्पष्ट आहे. याबाबत तासगाव पोलिसांत नोंद झाली आहे.

    सांगली : तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथे शेकोबा डोंगरावर एका युवकासह दोन तरुणींचा मृतदेह सापडला असल्याची खळबळजनक घटना गुरुवारी सकाळी निदर्शनास आली. प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याची परिसरात चर्चा आहे. मात्र, एक तरुण आणि दोन तरुणींनी एकाचवेळी आत्महत्या केल्यामुळे उलटसुलट चर्चा असून, नेमके कारण अस्पष्ट आहे. याबाबत तासगाव पोलिसांत नोंद झाली आहे.

    हरिष हणमंत जमदाडे (वय 21, रा. मणेराजुरी), प्रणाली उध्दव पाटील (वय 19, मूळ रा. जायगव्हाण, सध्या रा. मणेराजुरी) आणि शिवाणी चंद्रकांत घाडगे (वय 19, रा. हतीद, ता. सांगोला, जि. सोलापूर) अशी आत्महत्या केलेल्या तिघांची नावे आहेत.

    मणेराजुरी गावापासून दोन किलोमीटर अंतरावर शेकोबा डोंगर आहे. या डोंगरावर गुरुवारी सकाळच्या सुमारास गावातील काही नागरिक जात असतानाच त्यांना तिघेजण मृतावस्थेत आढळून आले. याची माहिती पोलीस पाटील व सामाजिक कार्यकर्ते प्रशांत पवार यांना देण्यात आली. त्यानी घटनास्थळी येत याची माहिती पोलिसांना दिली.

    घटनास्थळावर विषारी औषधाची बाटली, तीन ग्लास, लग्नात वापरण्यात येणारे हार, तुरे, चॉकलेट असे साहित्य आढळून आले. बुधवारी रात्रीच्या सुमारास हे तिघे या डोंगरावर आले असल्याचा संशय असून आत्महत्येमागे प्रेमसंबंधांचे कारण असावे, अशी चर्चा आहे. एकाचवेळी तिघांनी आत्महत्या केल्याची घटना समजल्यानंतर परिसरात खळबळ उडाली होती.

    घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती. घटनेची माहिती समजताच तासगाव पोलिसांनी घटनास्थळाला भेट देत पंचनामा केला. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनी घटनास्थळाला भेट दिली. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल शेळके करत आहेत.

    प्रेमाचा त्रिकोण की घातपात?

    मृत तरुणाचे नात्यातील असणाऱ्या प्रणाली या तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याची चर्चा घटनास्थळावर होती. या तरुणीने साडी परिधान केली होती. हार-तुरे असल्यामुळे लग्न करण्याचे नियोजन केले असावे, असे बोलले जात आहे. मात्र, डोंगरावर येतानाच विषारी औषधाची बाटली घेवून आल्यामुळे नियोजन करूनच आत्महत्या केली असावी, असा संशय आहे. मात्र, ही आत्महत्या प्रेमाच्या त्रिकोणातून झाली की आणखी काही कारणामुळे झाली, याचा नेमका उलगडा अद्याप झालेला नाही.

    तरुण रेकॉर्डवरचा आरोपी

    मृत हरीष जमदाडे हा काही महिन्यांपासून पोलिसांना हवा होता. तो चोरीच्या प्रकरणातील संशयित आरोपी असून, पोलिस त्याच्या मागावर होते. मात्र, तत्पूर्वीच हरीषचा मृतदेह सापडला आहे.