accident
accident

जुनोनी ता. येथील रंगकाम बघून परत निघालेल्या रंग कामगाराच्या मोटारसायकलीस कोळा-जुनोनी रोडवर अलदर पेट्रोल पंपासमोर भरधाव टिपरने धडक दिल्याने या अपघातात १ ठार तर २ जण जखमी झाले असल्याची घटना मंगळवारी (दि.२८) रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.

    सांगोला : जुनोनी ता. येथील रंगकाम बघून परत निघालेल्या रंग कामगाराच्या मोटारसायकलीस कोळा-जुनोनी रोडवर अलदर पेट्रोल पंपासमोर भरधाव टिपरने धडक दिल्याने या अपघातात १ ठार तर २ जण जखमी झाले असल्याची घटना मंगळवारी (दि.२८) रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी अज्ञात टिपर चालकविरोधात सुरेश मल्हारी महानवर (रा. सोनके ता. पंढरपूर जि. सोलापूर) यांनी सांगोला पोलिसात फिर्याद दिली आहे.

    या अपघातात श्रीमंत अर्जुन जाधव (रा. पंढरपूर) असे मयत झालेल्याचे नाव असून, रघुनाथ पांडुरंग माडकर (रा. करगणी ता. आटपाडी), सुरेश मल्हारी महानवर (रा. सोनके ता. पंढरपूर) असे दोघा जखमींची नावे आहेत.

    याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी व गावातील श्रीमंत अर्जुन जाधव व करगणी येथील मित्र रघुनाथ पांडुरंग माडकर असे तिघेजण मिळून खरसुंडी (ता. आटपाडी) येथे रंगकामासाठी गेले होते. तेथील काम संपत आल्यामुळे तिघेजण दुसरे रंगकाम बघण्यासाठी मोटारसायकलवरुन खरसुंडी येथून जुनोनी येथे २८ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता आले होते. काम बघून परत खरसुंडी येथे जाण्यासाठी निघाले यावेळी मोटारसायकल श्रीमंत जाधव हा चालवीत होता.

    तिघे मोटारसायकलवर जुनोनी-कोळामार्गे जात असताना अलदर पेट्रोल पंपासमोर रात्री सव्वा अकरा वाजता आले. तेव्हा एक टिपरने वेगात येऊन दुचाकीला समोरुन जोराची धडक दिली. या धडकेत श्रीमंत जाधव याच्या डोक्यास, कपाळावर जोराचा मार लागल्याने गंभीर दुखापत झाल्याने संबंधित व्यक्ती जागीच ठार झाला. तर फिर्यादी व रघुनाथ पांडुरंग माडकर जखमी झाल्याचे पोलीस फिर्यादीत सांगण्यात आले आहे.