मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावर ‘ट्रॅफिक जॅम’; नाताळनिमित्त पर्यटकांची गर्दी

    पिंपरी : मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर शनिवारी (दि. २५) बोरघाटात वाहनांच्या लांब रांगा लागल्यामुळे घाटातील वाहतूक संथ गतीने सुरू आहे. नाताळ व नववर्षानिमित्त सुट्ट्यांमुळे पर्यटक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले. द्रुतगती मार्गावर वाहनांची वाढलेली संख्या व त्यात बोराघाटात सुरु असलेली रस्त्यांची कामे यामुळे वाहनचालकांना वाहतुक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

    नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर परिसरात जाण्यासाठी मुंबईतील पर्यटक बाहेर पडले आहेत. याचा परिणाम बोरघाटातील वाहतुकीवर झाला. शनिवारी सकाळपासून पर्यटकांच्या वाहनांची संख्या वाढल्याने बोरघाटात पुणे लेनवर बोरघाट पोलीस चौकी, दस्तुरी, अमृतांजन पुल ते खंडाळा बोगदा दरम्यान तर मुंबई बाजूकडे खंडाळा एक्झिट ते नवीन अमृतांजन पुलादरम्यान वाहनांच्या पाच ते सहा किलोमीटर लांब रांगा लागल्या.

    वाहतूक संथ गतीने सुरु असल्यामुळे दोन्ही बाजूकडे वाहनांची रांग वाढतच गेली. बोरघाट, खंडाळा महामार्ग पोलिसांच्या वतीने वाहतुक सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत होते. मात्र, वाहतुक सुरळीत करताना वाहतुक पोलिसांना अक्षरश: नाकी-नऊ आले.