वहिवाटीचा रस्ता बंद केल्याने वाहतुकीची कोंडी; शेतकऱ्यांनी झाड टाकल्याने नागरिकांची गैरसाेय

लाल बहादूर हाउसिंग सोसायटीच्या सभासदाने पोकलँडच्या साह्याने वहिवाटीचा रस्ता  बंद केल्याने लगतच्या  शेतकऱ्यांनीही त्या रस्त्याला जोडणाऱ्या  रस्त्यावर झाड व बुंधा आडवा टाकून रस्ता बंद केल्याने रेणुकानगर, मकाजी पाटील मळा, हाउसिंग सोसायटीतील नागरिकांची वाहतुकीसाठी कोंडी झाली.

    शिरोली / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : लाल बहादूर हाउसिंग सोसायटीच्या सभासदाने पोकलँडच्या साह्याने वहिवाटीचा रस्ता  बंद केल्याने लगतच्या  शेतकऱ्यांनीही त्या रस्त्याला जोडणाऱ्या  रस्त्यावर झाड व बुंधा आडवा टाकून रस्ता बंद केल्याने रेणुकानगर, मकाजी पाटील मळा, हाउसिंग सोसायटीतील नागरिकांची वाहतुकीसाठी कोंडी झाली. दरम्यान, शिरोलीचे ग्राम विकास अधिकारी व्ही. बी. भोगण व  तलाठी निलेश चौगुले यांनी जागेवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून एका बाजूचा रस्ता खुला केला. तर दुसऱ्या बाजूबाबत कायदेशीररित्या शुक्रवारी कोर्टात बाजू मांडण्याचा निर्णय घेतला.

    येथील लालबहादूर हाउसिंग सोसायटीतील भूखंड असणाऱ्या सभासदाने आपल्या भूखंडातून रस्ता जात असल्याच्या विषयावरून गेल्या कित्येक वर्षापासून वहिवाट असणारा रस्ता दोन्ही बाजूला चर काढून कायदेशीर कारवाईने आपल्या भूखंडातून जात असल्याने हा रस्ता दोन्ही बाजू पोकलेनच्या साह्याने उकरून बंद केला. दरम्यान, या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या लगतच्या शेतकऱ्यांनीही त्यांच्या शेतातून जाणारा रस्ता मोठे झाड व बुंदा टाकून बंद केला. त्यामुळे रेणुका नगर, मकाजी पाटील मळा, हाउसिंग सोसायटीतील नागरिकांची कोंडी झाली.

    पदाधिकाऱ्यांनी केली पाहणी

    गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास सरपंच शशिकांत खवरे यांच्या सूचनेनुसार गाव कामगार तलाठी निलेश चौगुले तर ग्राम विकास अधिकारी व्ही. बी. भोगंन, तंटामुक्त अध्यक्ष सतीश पाटील, उपाध्यक्ष राजू पाटील या वादावर तोडगा काढण्यासाठी प्रत्यक्ष जागेवर आले. त्यांनी वस्तुस्थितीची पाहणी केली.

    ग्रामपंचायत न्यायालयात बाजू मांडणार

    लालबहाद्दूर हाउसिंग सोसायटीचा चर काढलेल्या रस्त्याबाबत जैसे थे स्थिती ठेवण्याचा न्यायालयाचा आदेश असताना त्यांनी दोन्ही बाजूस चर  काढल्याचे सांगून ग्राम विकास अधिकारी भोगण यांनी न्यायालयात ग्रामपंचायतीतर्फे बाजू मांडणार असल्याचे सांगितले. तर रेणुका नगरकडे जाणारे रस्त्यावरील झाडाचे बुंदे व झाड बाजूला काढून हा रस्ता खुला केला. यावेळी या भागातील दिलीप तेलवेकर, पंडित सावेकर, शामराव कौंदा डे, बैजू नवले, बाजीराव धामणे,  मारुती मिसाळ, सिद्धू पुजारी किशोर पुजारी यांच्यासह भागातील नागरिक उपस्थित होते.