बार्शीत गुन्हेगारी, चोर्‍या रोखण्यासाठी ग्राम सुरक्षा यंत्रणेची कार्यशाळा

    बार्शी / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : बार्शी शहर व परिसरात सध्या सतत चोरी, घरफोडी व इतर गुन्हेगारी घडण्याच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिक, व्यापाऱ्यांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी, यासाठी शहर पोलीस ठाण्याच्या वतीने ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

    सोलापूर ग्रामीण पोलीस दल आणि जिल्हा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम सुरक्षा यंत्रणा हा उपक्रम राबविला जात आहे. यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक भवनात झालेल्या कार्यक्रमात नगराध्यक्ष आसिफ तांबोळी, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे, पोलीस निरीक्षक रामदास शेळके, यांच्यासह नाशिक येथील या यंत्रणेचे संचालक डी. के. गोरडे उपस्थित होते.

    ग्राम सुरक्षा यंत्रणेमार्फत मागील नऊ वर्षापासून चार हजार गावातील ५६ हजार घटना हाताळल्या आहेत. तर या तांत्रिक यंत्रणेवर आजपर्यंत सात कोटी फोन केल्याचे संचालक डी. के. गोरडे यांनी सांगितले.

    ते म्हणाले, संकटकालीन प्रसंगामध्ये हे कॉल केले जातात. आजपर्यंत एकही चुकीचा फोन लागला नसल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. आपण या यंत्रणेत मोबाईल क्रमांक नोंदवून सहभाग नोंदविल्यास आपणास आजूबाजूला होणाऱ्या संकटाची माहिती होते.

    तसेच आपल्यावरही तसा प्रसंग ओढवल्यास आपण फोनवरुन या यंत्रणेच्या क्रमांकावर फोन केल्यास आपलाही या दुर्घटनेपासून बचाव होतो, असे गोरडे यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमात काही गावात घडलेल्या घटनांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

    बार्शी नगर परिषद व पोलिसांच्या सहकार्याने शहरातही ही यंत्रणा कार्यान्वित केल्यास कोणतीही दुर्घटना होणार नसल्याचे यावेळी पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी सांगितले.

    सर्व नागरिकांनी पोलीस होऊन आम्हाला सहकार्य करावे, असे आवाहनही शेळके यांनी केले. यावेळी, नगराध्यक्ष तांबोळी, विरोधी पक्षनेते अक्कलकोटे, प्रा. अशोक सावळे यांनीही विचार व्यक्त केले. कार्यक्रमास व्यापारी, नागरीक उपस्थित होते.