विदर्भ, मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या हातावर ‘तुरी’; तूर उत्पादनात येणार घट

यंदा सोयाबीन कपाशी संत्रा आदी पीके शेतकऱ्यांच्या हातातून गेली. वर्षभराचे आर्थिक गणित सांभाळणाऱ्या संत्र्याने सुद्धा यावर्षी शेतकऱ्यांना अडचणीत आणले. आता बळीराजाची उरलीसुरली मदार तुरीच्या पीकावर होती.

  हिंगोली, संकटाची मालिका शेतकऱ्यांचा पाठ सोडत नसल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. उत्पादनामध्ये झालेली घट आणि लागवडसाठी लागलेला खर्च कसा फेडायचा, सवकाराचे घेतलेले कर्ज कसे फेडायचे या विवंचनेने शेतकरी त्रस्त झाला आहे.

  त्यातच आता तुरीनेही विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या हातावर ‘तुरी’ दिल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. खरिपातील सर्वच पिकांना यंदा पेरणीपासूनच धोका राहिलेला आहे. त्यामुळे सोयाबीन आणि उडदाच्या उत्पादनात घट झालीच आहे पण आता अंतिम टप्प्यात असलेल्या तुरीलाही पावसाचा आणि ढगाळ वातावरणाचा फटका बसला आहे. बदलत्या वातावरणामुळे तुरीवर मररोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. महागडी औषधे फवारणी करूनही शेतकऱ्यांकडे पर्यायच उरलेला नाही.

  खरिपातील शेवटचे पीक
  तूर हे खरिपातील शेवटचे पीक आहे. मध्यंतरीच्या अतिवृष्टीचा या पिकावर परिणाम झाला नव्हता पण सध्या हे पिक शेंगा च्या पक्व अवस्थेत आहे. यातच मररोगाचे प्रमाण वाढत असल्याने याचा थेट परिणाम हा उत्पादनावर होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे ढग आहेत. हिंगोली जिल्ह्यात अंदाजे 80 हजार हेक्टर वर तूर पिकाचा पेरा आहे. जवळपास 70 टक्के जमीन क्षेत्रावरील तूर वाळून गेली आहे.

  सोयाबीन-संत्र्यानेही अडचणीत आणले
  यंदा सोयाबीन कपाशी संत्रा आदी पीके शेतकऱ्यांच्या हातातून गेली. वर्षभराचे आर्थिक गणित सांभाळणाऱ्या संत्र्याने सुद्धा यावर्षी शेतकऱ्यांना अडचणीत आणले. आता बळीराजाची उरलीसुरली मदार तुरीच्या पीकावर होती. परंतु वातावरणात झालेल्या बदलामुळे तुरीनेही शेतकऱ्यांच्या ‘हातावर तुरी’ दिल्या आहेत. मागील तीन दिवसांपासून विदर्भात असलेल्या ढगाळ व धुक्याच्या वातावरणामुळे तुरीवर दवाळ रोगाचे सावट आले आहे.

  वातावरणातील झालेल्या बदलामुळे अमरावती जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील तुरी सध्या करपल्या आहेत. तीन दिवसांपासून विदर्भात असलेल्या ढगाळ वातावरणामुळे याचा जबर फटका अमरावती जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. आधी सोयाबीन नंतर कपाशी आणि आता तूरीमुळे शेतकऱ्यांच्या समोरील संकटांची मालिका थांबण्याचं नाव घेत नाही. त्यामुळे सरकारने मदत करावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी केली आहे.


  e-KYC पूर्ण करा मगच हप्ता

  पीएम किसान निधी योजनेचा 10 वा हप्ता 15 डिसेंबरपर्यंत जारी होणार आहे. तथापि या योजनेत सरकारने काही बदल केले असून ई-केवायसी पूर्ण केल्यानंतरच शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता जमा होणार आहे. पीएम किसान योजनेंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांना सरकारने ई-केवायसी आधार अनिवार्य केले आहे.