एसटी महामंडळाच्या खात्यांतर्गत बढती परीक्षेत अडीच हजार कर्मचाऱ्यांनी मारली दांडी

एसटी महामंडळाच्या सुमारे ६८१ रिक्त पदांसाठीची खात्यांतर्गत बढती परीक्षा कोणतेही विघ्न न येता सुरळीत पार पडली असा दावा एसटी महामंडळाने केला आहे. मात्र, महामंडळाचा दावा फोल ठरला आहे.

  मुंबई : एसटी महामंडळाच्या सुमारे ६८१ रिक्त पदांसाठीची खात्यांतर्गत बढती परीक्षा कोणतेही विघ्न न येता सुरळीत पार पडली असा दावा एसटी महामंडळाने केला आहे. मात्र, महामंडळाचा दावा फोल ठरला आहे. काल परीक्षेतला पात्र असलेल्या ४ हजार कर्मचारी-उमेदवारांपैकी फक्त १ हजार ४६४ इतके कर्मचाऱ्यांनी बढती परीक्षा दिली आहेत. तर अडीच हजार कर्मचाऱ्यांनी बढती परीक्षा दांडी मारत महामंडळाचा विरोध केला आहे.

  २८ केंद्रांवर झाली परीक्षा

  गेल्या दोन महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. अनेकदा कामावर हजर होण्याचे आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडून करण्यात आले आहे. मात्र, कर्मचारी संपावर ठाम असल्याने महामंडळाचे मोठे नुकसान होत आहे. हा संप मोडून काढण्यासाठी प्रशासनातर्फे सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. आतापर्यत एसटी महामंडळाने १० हजारापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. तर अडीच हजार पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचा बदल्या केल्या आहे. तरी ही एसटी कामगारांचा संप मोडून काढण्यात महामंडळाला अपयश येत आहे. आता तर चक्क एसटी महामंडळाने महामंडळातील वरिष्ठ लिपिक,सहाय्यक वाहतूक निरिक्षक व वाहतूक नियंत्रक या संवर्गाच्या ६८१ रिक्त पदांसाठीची खात्यांतर्गत बढती लेखी परीक्षा घेण्याचा घाट महामंडळाने घातला आहे. त्यानुसार आज, आज राज्यभरात तब्बल २८ केंद्रांवर एकाच वेळी हि परीक्षा घेण्यात आली होती.

  परीक्षा रद्द करण्याची होती मागणी

  संपकरी एसटी कर्मचाऱ्यांच्या मार्फत सदर परीक्षा रद्द करण्यात यावी, अशी मागणी न्यायालयात करण्यात आली होती. तथापि, परीक्षा रद्द करण्यास न्यायालयाने स्पष्ट नकार दिला. उलट ज्या संपकरी कर्मचाऱ्यांना बढती परीक्षेला बसायचे आहे,त्यांनी रुजू अहवाल सादर करुन परीक्षेस उपस्थित रहावे असे आदेश दिले.

   २ हजार ५३६ कर्मचारी गैरहजर

  आज राज्यभरात तब्बल २८ केंद्रांवर एकाच वेळी हि परीक्षा पार पडली आहे. एसटी महामंडळाच्या वाहतूक नियंत्रक, सहाय्यक वाहतूक निरीक्षक, वरिष्ठ लिपिक अशा विविध पदांसाठी खात्यांतर्गत बढती परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला सुमारे ६८१ जागांसाठी पदांसाठी ४ हजार कर्मचारी-उमेदवारांना पात्र करण्यात आले होते. त्यापैकी परिक्षेला प्रत्यक्ष १ हजार ४६४ इतके कर्मचारी – उमेदवार उपस्थित होते. तर परीक्षेला पात्र असलेले २ हजार ५३६ कर्मचारी गैरहजर होते. या परीक्षेचा निकाल लवकर जाहीर करण्यात येईल, असे एसटी प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. मात्र संपामुळे एसटी महामंडळातील शेकडो कर्मचारी या बढती परीक्षांपासून आज वंचित राहिले आहे.

  जागा भरण्यासाठी खात्या अंतर्गत बढती परीक्षा

  महामंडळाकडे सध्या विविध सेवा देणारे सुमारे ९२ हजार २६६ लाख कर्मचारी आहेत. सेवेवरील उच्चशिक्षित कर्मचाऱ्यांना महामंडळात बढतीसाठी परीक्षा देता येते. महामंडळाकडून खात्याअंतर्गत बढतीसाठी शेवटची परीक्षा डिसेंबर २०१८ मध्ये घेण्यात आली होती. त्यानंतर कोरोनामुळे परीक्षाच झाली नाही. ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणाऱ्या जागा विचारात घेऊन जागा भरण्यासाठी खात्याअंतर्गत बढती परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. एसटी महामंडळातील ३ वर्ष सेवा पूर्ण करणारे शेकडो कर्मचारी या परीक्षेची वाट पाहात होते. अखेर एसटी महामंडळाने संप काळात ही परीक्षा घेतली आहे.