आठ हजारांच्या लाचेने गमावली नोकरी

मिळकतीचे हस्तांतरण व कर पावतीच्या दुरुस्तीसाठी कोठावदे आणि मोरे यांनी साडेआठ हजार रुपयांची लाच मागितली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना लाच घेताना १८ डिसेंबर रोजी रंगेहाथ पकडले.

    पिंपरी : मिळकतीचे हस्तांतरण व कर पावतीच्या दुरुस्तीसाठी लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागातील दोन लिपिकांना निलंबित करण्यात आले. या लिपिकांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत.

    प्रदीप शांताराम कोठावदे, हैबती विठ्ठल मोरे असे निलंबित केलेल्या लिपिकांची नावे आहेत. हे लिपिक महापालिकेच्या थेरगाव येथील करसंकलन कार्यालयात कार्यरत होते. मिळकतीचे हस्तांतरण व कर पावतीच्या दुरुस्तीसाठी कोठावदे आणि मोरे यांनी साडेआठ हजार रुपयांची लाच मागितली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना लाच घेताना १८ डिसेंबर रोजी रंगेहाथ पकडले. त्यांच्यावर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

    लोकसेवक म्हणून पदाचा गैरवापर

    या दोन लिपिकांनी लोकसेवक म्हणून पदाचा गैरवापर केला. अशोभनीय गैरवर्तन केले. त्यामुळे महापालिकेची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यामुळे कोठावदे आणि मोरे यांना अटकेच्या दिनांकपासून सेवानिलंबित करण्यात आले. त्यांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत.